अष्टविनायक यात्रा करायची आहे? पाहा सर्वात सोपा मार्ग आणि प्रवासाचे योग्य नियोजन
शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 (07:30 IST)
Maharashtra Tourism : अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक आहे. ही यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मोरगाववरून सुरुवात करून पुन्हा मोरगावलाच सांगता करावी लागते. तसेच अष्टविनायक यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्याचा आणि वारशाचा अनुभव देणारी एक मंगलमय सफर आहे. जर तुम्ही ३ दिवसांचे नियोजन करत असाल, तर खालील सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग तुम्हाला उपयोगी पडेल. तर चला जाणून घेऊ या....
१. मयूरेश्वर (मोरगाव): यात्रेची सुरुवात मोरगावपासून करा. पुण्यापासून हे साधारण ६५ किमी आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत येथे पोहोचल्यास दर्शन लवकर होईल.
२. सिद्धिविनायक (सिद्धटेक): मोरगाववरून सिद्धटेकला जा (अंदाजे ७० किमी). येथील गणपतीची सोंड उजव्या बाजूला असून हे मंदिर भीमा नदीच्या काठी आहे.
३. चिंतामणी (थेऊर): सिद्धटेकवरून थेऊरला या. हे पुण्याजवळ आहे.
४. महागणपती (रांजणगाव): पहिल्या दिवसाची सांगता रांजणगावच्या दर्शनाने करा.
मुक्काम: रांजणगाव किंवा पुणे येथे मुक्काम करणे सोयीचे ठरेल.
दिवस २: पुणे परिसर आणि निसर्गरम्य घाट
५. विघ्नेश्वर (ओझर): सकाळी लवकर ओझरला पोहोचा. कुकडी नदीच्या पात्रातील हे मंदिर अतिशय शांत आहे.
६. गिरिजात्मज (लेण्याद्री): ओझरपासून लेण्याद्री अवघ्या १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे डोंगरकपारीत कोरलेली लेणी आहेत. (टीप: ३०७ पायऱ्या चढून जावे लागते, त्यासाठी सकाळी लवकर जाणे हिताचे आहे).
मुक्काम: ओझर किंवा लेण्याद्री येथील भक्तनिवासात मुक्काम करण्याचा अनुभव खूप छान असतो.
दिवस ३: कोकण किनारपट्टी आणि सांगता
७. वरदविनायक (महड): दुसऱ्या दिवशी सकाळी खोपोलीमार्गे महडला निघा. हे मंदिर साधे आणि खूप जागृत मानले जाते.
८. बल्लाळेश्वर (पाली): महडवरून पालीला जा. भक्ताच्या नावाने ओळखले जाणारे हे एकमेव मंदिर आहे.
९. मयूरेश्वर (मोरगाव): शास्त्राप्रमाणे यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला जाऊन दर्शन घेतल्याने पूर्ण होते.