पाच नद्यांचा विहंगम संगम : अंभोरा

शनिवार, 6 जुलै 2019 (12:20 IST)
पाच नद्यांचा विहंगम संगम, दाट वनराई आणि टेकडीवर असलेले महादेवाचे मंदिर असे चित्रवत भासावे असा निसर्ग आपल्याला भेटतो ते अंभोर्‍याला. विदर्भातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून अंभोर्‍याचा लौकिक आहे. नागपूरवरून पाच गाव, डोंगरगाव, कुटी, वेलतुर मार्गे ८० कि.मी. आणि भंडार्‍यावरून १८ कि.मी. अंतरावर अंभोर्‍याचे देवस्थान आहे. 
 
अंभोर्‍याला जायचे तर भंडार्‍यावरुन जाणे जास्त आनंददायी आहे. भंडार्‍याहून गेले की मंदिरापर्यंत पोहोचायला नदी ओलांडून जावे जागते. त्यासाठी इथे होड्या असतात. त्यांना इथल्या बोली भाषेत डोंगा म्हणतात. या डोंग्यातून नदी पार करुन मंदिरापर्यंत जाणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. अंभोर्‍याला असणार्‍या टेकड्यांना ब्रम्हगिरी पर्वत म्हणतात. इथे दोन-तीन नव्हे तर चक्क पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेलं अंभोरा हे देवस्थान त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंभोर्‍याला मंदिर आहे ते महादेवाचे. भरगच्च पसलेली झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू आणि थोड्या अंतरावर टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आंब नदी आणि या निसर्ग सौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर बघताच सर्व दु:ख विसरायला लावणारे आहे. कदाचित म्हणूनच इथल्या महादेवाचे नावही चैतन्यश्वर आहे. चैतन्य इथल्या कणाकणात ठासून भरल्याचे बघता क्षणीच जाणवते.
बगीच्यात अनेक दुर्मिळ वनस्पती आणि झाडे लावण्यात आली आहे. हरिनाथ मंदिरात असलेल्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे 'मराठीचे आदय कवि श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे.' 
 
चैतन्यश्वराचे मंदिर हे महादेवाच्या पुरातन मंदिरासारखेच आहे. पांढर्‍या चुन्याने रंगविलेले हे मंदिर दुरुनही लक्ष वेधून घेते. १२ वर्षाच्या महाव्रतानंतर ब्रम्हगिरीवर झालेल्या महायज्ञातून इथे चैतन्यश्वर प्रगट झाले असे म्हणतात. त्यामुळे सर्व दु:ख विनाशक आणि सुखाचा वर्षाव करणारा इथला महादेव चैतन्यश्वर म्हणून भक्तप्रिय आहे.
इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि संपूर्ण विदर्भातून लोक इथे दर्शनाला येतात. तेव्हा इथे असंख्य राहुट्यांचा डेरा पडलेला असतो. आणि या गजबजाटाने एक नवे चैतन्य या परिसराला मिळते. या शिवाय कार्तिक स्नान समाप्ती आणि दशाहार, गंगापूजन असे काही उत्सव इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मंदिराच्या पश्चिमेला तीन समाधी मंदिर आहेत. यामध्ये एक समाधी नेपाळच्या राज्याच्या मुलाची आहे. श्री हरिनाम महाराज आणि त्यांचे शिष्य श्री रघुनाथ उर्फ रामचंद्र महाराज यांची संजीवन समाधी इथे आहे. समाधी मंदिराला लागून आता एक सुंदर बगीचा करण्यात आला आहे. या बगीच्यात अनेक दुर्मिळ वनस्पती आणि झाडे लावण्यात आली आहे. हरिनाथ मंदिरात असलेल्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे 'मराठीचे आदय कवि श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे.'
हरिनाथ समाधी मंदिराच्या परिसरात मारूती व गणपतीचे मंदिर आहे. गणपतीच्या मंदिराखाली पाताळ गंगेचे मंदिर आहे. दशाहराला इथे असंख्य लोक गंगा पूजनासाठी गर्दी करतात. ज्येष्ठ महिन्यातल्या रणरणत्या उन्हाळ्यातही ज्येष्ठ शुध्द दशमीला नदीचे पात्र विस्तारते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. पाच नद्यांचा संगम हे अंभोर्‍याचे वैशिष्ट्य पर्वतामधून पाच धारा अव्याहतपणे खाली कोसळत असतात. ते दृष्य विलोभनीय असते. यातलीच वैनगंगा पुढे मार्कंड्याला मिळते. पहाडामध्ये एका जुन्या किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात. या किल्ल्यातून सर्व दूर पसरलेली खेडी आणि शहरे दिसतात. अंभोर्‍याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. मंदिर परिसरातच भक्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आली असून जेवणाचीही उत्तम व्यवस्था आहे. जिल्हा परिषदेचे विश्रामगृह मंदिरापासून जवळच आहे. लवकरच पर्वतावरुन मंदिराकडे जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. इथल्या शांत अस्पर्श निसर्ग आणि नद्यांचा संगम यामुळे अंभोर्‍याला भेट देणे हा एक सुखद अनुभव असतो. आणि चैतन्येश्वराकडून मिळालेल्या चैतन्याचा स्वीकार करत भक्त तृप्त मनाने संसाराच्या समस्यांना सामोरे जायला तयार होतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती