बारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर
शुक्रवार, 14 जून 2019 (16:45 IST)
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकरचा परिसर धुक्यात हरवलेला पाहून निसर्गाच्या चमत्काराला आपण नमस्कार करतो... सर्वत्र हिरवाई... पक्षांचा किलबिलाट...अशा प्रसन्नचित्त वातावरणात आपण भीमाशंकरच्या चरणी नतमस्तक होतो...
भीमाशंकर.. बारा ज्योतिर्लिंगापेकी एक. . .डाकिन्या भीमाशंकर अशी पुराणात ओळख असलेल हे एक थंड हवेच ठिकाण. . .निसर्गप्रेमी, जंगलप्रेमी, गिर्यारोहक, पक्षीनिरीक्षक यांच्यासाठे हे नंदनवनच. तीर्थाटनाबरोबरच वन्यजीव व वनौषीधींचा अभ्यास याठिकाणी करायला मिळतो.
येथे येणारे भाविक मंदीराचा परिसर पाहूनच प्रसन्न होतात. हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदीरात चांदीचे शिवलिंग आहे. याठिकाणी श्रावणात, महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भीमाशंकरची ओळख आता वनपर्यटनाचे ठिकाण म्हणूनही होऊ लागली आहे.
पुणे, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांचा 125 चौरस किलोमीटर क्षेत्राचा हा परिसर.. या क्षेत्रात पसरलेल्या अभयारण्यात सांबर, चितळ, हरीण, भेकर, तरस, कोल्हे, रानडुकरे, उदमांजर, खवले मांजर, वानर, ससे या प्राण्यांचा वावर आहे. या जंगलात असलेल्या गावांतील लोकांची ये-जा करण्याची वाट याच जंगलातूनच जाते. रात्री-अपरात्री या वाटेनेच ते जातात-येतात पण इथली जनावरं त्यांच्या अंगावर आली नाहीत. त्यांच्या रहाण्याच्या जागा पायवाटेपासून बर्याच अंतरावर असल्यामुळे असेल कदाचित. मंदिराच्या पूर्वेला थोड्या अंतराने खाली गेलं की जंगलाची सुरुवात होते. दहा मिनिटांच्या अंतराने घनदाट जंगल सुरु होते. रानटी आंबे, जांभळ, करप (अंजन), मळवा, फनसाल, करंबो, शेंद्री, हिरडा, भेडा ही वृक्ष दाटीवाटीने उंचीसाठी स्पर्धा करतायत असा भास व्हावा एवढया उंचीचे वृक्ष. सूर्याच्या किरणांना जमिनीवर येण्यासाठी मज्जाव . . . त्यामुळे वातावरणात गारवा. जसजस आपण जंगलाच्या आतमध्ये जाऊ तसा गारवा वाढत जातो.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी अशी ओळख असलेली शेकरू या ठिकाणी पहायला मिळते. ही दुर्मिळ जात या जंगलातच पाहयला मिळते. त्यासाठी अभ्यासक मोठ्या प्रमाणावर येथे येतात. शेकरू म्हणजे थोडक्यात उडणारी मोठी खारच. एक शेकरु वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करते. एका झाडावरुन दुसर्या झाडावर सहज झेप घेणारे शेकरु 15 ते 20 फुटांची लांब उडी मारु शकते. झाडाच्या वरच्या बाजूला जिथे मोठ्या वजनाचा पक्षी किंवा प्राणी जावू शकणार नाही. एवढया अवघड ठिकाणी यांच्या घराची रचना असते. अभयारण्यात गेल्या वर्षीच्या पाहणीनुसार 1200 शेकरू आहेत. लांडोर, गरुड, सर्पगरुड, घार, भारतीय रात्रींचर, काळा बुलबुल हे पक्षी देखील येथे आढळतात. नाग, मण्यार, घोणस, अजगर या प्राण्यांबरोबरच अनेकविध रंगीबेरंगी फुलपाखरं देखील अभयारण्यात आढळतात. ब्ल्यू मॉरमॉन हे अर्धा फूट लांबीचे फुलपाखरु पाहण्याचा आनंद तर अवर्णनीयच.
घनदाट अरण्यातून दोन कि.मी.च्या अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे. त्या रस्त्यानी जाताना आपली नजर भिरभिरती ठेवल्यास बर्याच गोष्टींची माहिती होते. टिपनी ही वनस्पती मुका मार लागलेल्या ठिकाणी चोळून लावल्यास साकळलेले रक्त पूर्ववत होण्यास मदत होते. ही वनस्पती या ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळते. आपण मसाले भाताला चवदार करण्यासाठी तमालपत्र टाकतो. ते देखील या ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळते. येथील आदिवासी याचा उपयोग करतात. त्यांच्या जवळून जाताना त्या वासाची खात्री होते. हे सर्व निरिक्षण करता करता आपण पुढे गेलात की, एका दरीत पापमोचन तीर्थ दिसते जे भीमाशंकर मंदिराजवळील कुंडापासून जमिनीखालून वाहत या ठिकाणी भीमा नदेच्या रुपात प्रकट होते. त्या स्थळालाच 'गुप्तभीमा ' असे म्हटले जाते. भिमा जिथे उगम पावते तिथे दगडामध्ये छोटेसे शिवलिंग आहे. लहान झर्याच्या स्वरुपात वाहणारा प्रवाह पावसाळ्यात मोठा धबधबा होतो, तो या शिवलिंगावर पडून सतत अभिषेक करत असतो. चोहोबाजूंनी हिरव्या गर्द टेकड्यांनी अच्छादलेले हे ठिकाण सुंदर आहे. मनाला पुन्हा पुन्हा साद घालणारं हे ठिकाण पर्यटकांसाठी दुहेरी मेजवानी देणारं आहे. सह्याद्रीच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेलं हे स्थान भोवतालच्या जगाचं, किल्याचं, नद्यांच आणि अनेक पर्यटन स्थळांचं अनोखं, आल्हाददायक दर्शन घडवतं. त्याचा आस्वाद घ्या. मात्र हा आस्वाद घेताना येथील निसर्ग, पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची काळजीही घ्या आणि सुट्यांचा आनंद व्दिगुणीत करा.
भीमाशंकर अभयारण्यातील काही महत्वाचे पॉइंटस्
सनसेट पॉंईंट :
या ठिकाणाहून खाली पाहिल्यानंतर हिरव्या रंगाच्या अनेक छटांनी मुक्त उधळण केलेला माथेरानपर्यंतचा मनमोहक परिसर डोळ्याचे पारणे फेडतो. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा काही भाग आणि प्रसिध्द मच्छिंद्रगड (हाजी मलंग) इथून दिसतो. या ठिकाणाहून सुर्यास्ताचे दृश्य नयन मनोहर दिसते.
नागफणी पॉंईंट :
अंजनीमाता मंदिराच्या मागच्या बाजूने वर चढून गेल्यानंतर नागफणी पॉंईंट आहे. वर गेल्यानंतर दिसणारे दृश्य माणसाला जागच्या जागी खिळवून ठेवते. श्वास रोखून धरायला लावणार्या सहयाद्री पर्वताच्या रांगा, खाली दरीत दिसणारे पेण आणि तुंगीपदर हे किल्ले आणि माथेरानाचा रम्य परिसर, खाली दरीत दिसणारी गांव , शेतं, माणसं, नदी, जलाशय सगळं काही चित्रात असल्याप्रमाणे चिमुकलं दिसत. हे संगळ दृश्य मन मोहून टाकतं.
वनस्पती पाँईट :
या ठिकाणी वनस्पती देवी आहे. पूर्वी सह्याद्रीच्या पूर्व पठारावरची मंडळी रोगराई झाली की, वाजत-गाजत येथे येत असत. देवीची पूजा करुन आपला रोग खाली कोकणात सोडला अशी भावना ते ठेवत. या ठिकाणी वेगवेगळ्या रोगांवर `ईलाज` करणार्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत.
पेशवाई घंटा :
भिमाशंकर या हेमाडपंथी मंदीराच्या गाभार्याचा जिर्णोध्दार करण्याचे काम पेशवाईत नाना फडणीस यांनी आरंभिले होते, पण दुर्देवाने त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नीने या गाभार्याचे काम पूर्ण केले. वसईच्या युध्दात पेशवाईने जिंकलेली एक महाकाय घंटा पेशव्यांच्या नावाने या ठिकाणी अजूनही मंदिराच्या बाहेरच्या चबुतर्यावर ठेवली आहे.
भिमाशंकर नावामागची कथा
बारा पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सहयाद्रीच्या कुशीत भिमाशंकर या नावाने प्रसिध्द आहे. त्रिपुरासुर नावाचा एक दैत्य होता. तो देव-मानवांवर अग्निवर्षाव करी. त्याच्या या उत्पाती सामर्थ्यापुढे सगळे देव हतबल झाले आणि त्यांनी महादेवाला शरण जावून त्रिपुरासुराच्या वधाची याचना केली. शंभुमहादेवाने बर्याच प्रयत्नानंतर पाशुपत मंत्राने बाण तयार करुन या दैत्याचा वध केला. हा वध करण्यासाठी महादेवाला बरेच श्रम करावे लागले. त्यामुळे त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. भीमक नावाचा राजा या ठिकाणी जप करत असे, तो त्या प्रसंगी तिथे आला आणि ''या धर्मधारांची पुण्यपावन नदी होऊ दे'' असा वर मागितला. या त्याच्या वरामुळे या स्थानाला भिमाशंकर नाव पडले आणि तेथून उगम पावलेल्या नदीला 'भिमा' हे नाव पडले अशी पुराणकथा आहे.
कसे जाल?
भीमाशंकरपासून सर्वांत जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन पुणे आहे. पुण्यापासून भीमाशंकर 125 कि.मी. अंतरावर आहे. पुणे-नाशिक महामार्गाने मंचरपर्यंत येऊन डाव्या बाजूच्या वळणाने भीमाशंकरकडे वळावे लागते. मंचर-भिमाशंकर हे अंतर 65 कि.मी. एवढे आहे. शिवाजीनगर बसस्थानक (पुणे) येथून पुणे- भिमाशंकर बसेस आहेत.
मुंबईहून माळशेज घाटमार्गे भिमाशंकरला जाता येते. मुंबई-कल्याण-मुरबाड-जुन्नर-भीमाशंकर असा हा 260 कि.मी. अंतराचा प्रवास आहे. चेंबूर, ठाणे, कल्याण या बसस्थानकांवरुन भीमाशंकरकडे जाणार्या बसेस सुटतात.