लिव इन रिलेशनशिपला महाराष्ट्र सरकारने मंजूरी दिली आहे. याचा अर्थ कायद्याने विवाह न करता एकत्र रहाणारे स्त्री- पुरूष यांच्यातील नातेसंबंध आता कायदेशीर होतील. राज्य सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीतूनच आला आहे. परंतु, अशा प्रकारच्या संबंधामुळे निर्माण होणार्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीकडून आलेल्या शिफारशीनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप मिळणार आहे.
लिव इन रिलशनशिपमध्ये काही काळानंतर दुरावा निर्माण झाल्यास किंवा दोघांमध्ये मतभेद होऊन वेगळे राहण्याची वेळ आल्यास त्या महिलेला पोटगी देण्याची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारच्या संबंधामुळे राज्याच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेवर काही परिणाम होईल का? याचाही राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे.
'लिव इन रिलेशनशिप' योग्य की अयोग्य हे ठरवताना सुरवातीला समाजाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण आपल्याकडे समाज हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतीही गोष्ट करताना आपण पहिल्यांदा लोकांचा विचार करत असतो. समाज, लोक काय म्हणतील? असा प्रश्न नेहमी असतो. जर समाजाने अशा प्रकारच्या संबंधाला मान्यता दिली तर 'लिव इन रिलेशनशिप' ठेवण्यास काहीही हरकत नाही. पण लिव इन रिलेशनशिप ही काळाची गरज आहे, असे मला वाटत नाही. आपल्या सोयीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, हे तितकेच खरे!
ND
एका स्त्रीशी लग्न झाले असताना दुसरीबरोबर संबंध ठेवणे, हे एक प्रकारे लिव इन रिलेशनशिपच आहे. जर आपण नैतिकतेचा विचार केला तर समाजाने अशा संबंधाला कधीच मान्यता दिलेली नाही. कारण, आपल्याकडे दोन बायका करण्यावर कायद्याने बंदी आहे. दुसर्या स्त्रीला पत्नीचा दर्जा दिला जाणार असल्याने आधीच्या कायद्याचा हा भंग आहे. या संबंधाला कायदेशीर मान्यता मिळाल्यास लग्न न करता एकत्र राहणार्यांनाही कायदेशीर मान्यता मिळू शकेल. मात्र, त्याला समाजाचीही मान्यता लागेल.
माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे तो आपले कुटूंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींचा नेहमी विचार करत असतो. म्हणून लिव इन रिलेशनशिपला त्यांची मान्यता मिळवावी लागेल. जर त्यांनीच विरोध केला तर त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या संबंधातून नंतर आपल्याला मुले झाली तर त्यांचे काय? हा एक मोठा प्रश्न आहे. त्या महिलेला संपत्तीत वाटा मिळणार की नाही? अशा प्रकारे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. या सर्वांचा विचार करूनच लिव इन रिलेशनशिपला मान्यता देण्यात यावी असे वाटते.
विवाह म्हणजे दोन कुटुंब, समाज आणि दोन संस्कृतीचे मीलन मानले जाते. नेमका हाच फरक लिव इन रिलेशनशिपमध्ये आहे. यामध्ये आपल्यावर जबाबदारी असते. लिव इन रिलेशनशिपमध्ये ती नसते. कारण, पटलं तर एकत्र राहा नाहीतर विभक्त व्हा असा हा मामला आहे.
हे सर्व काही असले तरी लिव इन रिलेशनशिपमुळे संस्कृतीला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही, असेही वाटते. कारण, आपल्या संस्कारातून संस्कृती घडत असते. आपल्याकडे विविध पद्धतीने विवाह केला जातो. त्यामुळे आपोआपच एका संस्कृतीवर दुसर्या संस्कृतीचा प्रभाव पडत असतो. म्हणून लिव इन रिलेशनशिप अशाच प्रकारचे नाते आहे. ते आपल्या स्वीकारायचे की नाही हे प्रत्येकाने किंवा समाजाने ठरवायचे आहे. कारण, भारतीय लोकशाहीत नागरिकाला तसे स्वांतत्र्य दिले आहे.