लोकसभा निवडणूक सात एप्रिलपासून

बुधवार, 5 मार्च 2014 (17:42 IST)
१६ व्या लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून नऊ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. ७ एप्रिल ते १२ मे अशा महिनाभराच्या कालावधीत हे नऊ टप्पे पार पडणार असून १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाचे आयुक्त व्ही.एस.संपत यांनी बुधवारी नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यंदाच्या निवडणुकीत तब्बल ८१ कोटी ४० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी देशभरात ९ लाख ३० हजार मतदानकेंद्रे असतील असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्या मतदारांचे मतदार यादत ना नाही, त्यांना आणखी एक संधी देण्यात येणार असून रविवार ९ मार्च रोजी देशभरात मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नकारात्मक मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर करण्यात येणार असून मतदारांचे छायाचित्र असलेली व्होटींग स्लीप यंदाच्या निवडणुकीपासून देण्यात येईल अशी घोषणाही संपत यांनी केली. 
कधी कुठे होणार निवडणूक
७ एप्रिल - आसाम (५ जागा) आणि त्रिपुरा (१ जागा)
९ एप्रिल - अरुणाचल प्रदेश व मेघालय (प्रत्येकी २ जागा) ,मिझोराम, नागालँड व मणिपूर (प्रत्येकी १ जागा)
१० एप्रिल - अंदमान व निकोबार,चंडीगढ, छत्तीसगढ, जम्मू - काश्मीर, लक्षद्वीप (प्रत्येकी एक जागा), बिहार (६), हरियाणा (१०), झारखंड (५), केरळ (२०), मध्यप्रदेश (९), महाराष्ट्र (१०), दिल्ली (७), ओदिशा व उत्तरप्रदेश (१०)
१२ एप्रिल - आसाम (३), सिक्किम व त्रिपुरा (१)
१७ एप्रिल - बिहार (७), छत्तीसगढ (३), गोवा (२), जम्मू आणि काश्मीर (१), झारखंड (५), कर्नाटक(२८), मध्यप्रदेश (१०), महाराष्ट्र (१९), मणिपूर (१), ओदिशा (११), राजस्थान (२०), उत्तरप्रदेश (११),पश्चिम बंगाल (४)
२४ एप्रिल - आसाम (६), बिहार (७), छत्तीसगढ (७), जम्मू आणि काश्मीर (१), झारखंड (४), मध्यप्रदेश (१०), महाराष्ट्र (१९), पुदुच्चेरी (१), राजस्थान (५), तामिळनाडू (३९), उत्तरप्रदेश (१२), पश्चिम बंगाल(६)
३० एप्रिल - आंध्रप्रदेश (१७), बिहार (७), दादरनगर हवेली (१), दमणदिव (१), गुजरात (२६), जम्मू (१), पंजाब (१३), उत्तरप्रदेश (१४) आणि पश्चिम बंगाल (९)
७ मे - आंध्रप्रदेश (२५), पश्चिम बंगाल (६), हिमाचल (४), जम्मू आणि काश्मीर (२), उत्तरप्रदेश (१५), उत्तराखंड (५), बिहार (७)
१२ मे - बिहार (६), उत्तरप्रदेश (१८) आणि पश्चिम बंगाल (१७)
१६ मे - देशभरात मतमोजणी

वेबदुनिया वर वाचा