अनंत गितेंना कमी महत्त्वाचे खाते; शिवसेना नाराज?

मंगळवार, 27 मे 2014 (16:00 IST)
शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना अवजड उद्योग मं‍त्रालय दिले आहे. त्यामुळे केंद्रात कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने शिवसेना नाराज झाल्याचे समजते. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गिते यांनी मंगळवारी चर्चा केल्याचेही समजते. शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला. परंतु त्या तुलनेत मोदींच्या मंत्रिमंडळात कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने शिवसेनात नाराजी पसरली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत गिते यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. तरी देखील गितेंनी अजूनपर्यंत अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला नाही. मात्र उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर गिते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार असल्याचे समजते. 

मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला फक्त एकच कॅबिनेट अवजड उद्योग मंत्रालय दिले आहे. या तुलनेने  लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान यांना चांगले खाते दिल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिल्याने शिवसेना  नाराज झाली होती. शिवसेना नेत्यांनी नवाझ शरीफ यांच्या भारतात येण्यावर विरोध केला होता. परंतु मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचा विरोध मावळला होता. आता मात्र शिवसेनेला केंद्रात एकमात्र मंत्रीपद दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे.

वेबदुनिया वर वाचा