सोनियांनी माफी मागावी- अडवानी

भारताला बाहेरून येणार्‍या अतिरेक्यांपेक्षा देशातल्याच लोकांकडून जास्त धोका आहे, या कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला उद्देशून केलेल्या विधानाबद्दल पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून यासाठी सोनियांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

सोनियांनी झारखंडमध्ये केलेल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली होती. या भाषणाचा संदर्भ देऊन त्यांची विधाने धक्कादायक असल्याचे अडवानींनी सांगितले. सोनियांनी कुणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांच्या टीकेचा रोख आमच्या पक्षाकडेच होता हे स्पष्ट होते, असे अडवानी म्हणाले. सोनियांना पक्षाची परंपरा माहित नसावी असे सांगून ते म्हणाले, १९६२ व १९६५ च्या युद्धात जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेल्या भूमिकेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते. एकदा तर १९६३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी संघाची एक तुकडी पाठविण्यास नेहरूंनी संगितले होते. पण सोनियांना आपल्याचा पक्षाचा इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही. त्यामुळेच त्या अशा प्रकारची विधाने करत असाव्यात, अशा शेलक्या शब्दांत अडवानींनी सोनियांवर टीका केली. सोनियांनी अशा विधानांबद्दल माफी मागायला पाहिजे किंवा अल कायदासह इतर विषयांवर आमच्याशी चर्चा करावी असे आव्हानही त्यांनी दिले.

सोनियांचे हे विधान मुंबई हल्ल्याप्रकरणी आपण देशातर्फे मांडत असलेल्या भूमिकेलाही छेद देणारे आहे, असे अडवानी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा