नांदेड लोकसभेचे महायुतीचे भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमध्ये हजेरी लावली. यावेळी अमित शहा यांनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी राहिलेल्या काँग्रेसची सध्या “तीन तिगाडा, काम बिघाडा” अवस्था झाली असल्याचा टोला शहांनी लगावला.
नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन मतदारांना केले. तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. “वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते, मात्र नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. नांदेडकर प्रतापराव पाटील यांना जे मत देणार आहेत, ते मत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी असणार आहे.”
महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अर्धी झाली आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी झाली आहे आणि या दोन्ही अर्ध्या पक्षांनी मिळून काँग्रेसलाही अर्धे केले आहे. त्यामुळे हे तिन्ही अर्धे पक्ष मिळून महाराष्ट्राचे भले करणार का? असा प्रश्नही यावेळी अमित शहांनी जाहीर सभेतून उपस्थित केला.