शिर्डी लोकसभा: ठाकरे गटाकडून वाकचौरे, महायुतीकडून कोण उभं राहणार?

गुरूवार, 28 मार्च 2024 (11:30 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला.
 
मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे 2009 पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा 'शिवसेना' विरुद्ध 'शिवसेना' म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे.
 
2014 मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये परतले आहेत.
 
बुधवारी (27 मार्च) जाहीर केलेल्या मतदारयादीत शिवसेनेनं शिर्डीसाठी त्यांना उमेदवारी जाहीरही केली आहे.
 
या मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास या ठिकाणी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने असतील.
 
पण राज ठाकरेंनी मनसेसाठी शिर्डीच्या जागेची मागणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळं महायुतीकडून उमेदवाराची घोषणा होईपर्यंत या ठिकाणचं लढतीचं चित्र स्पष्ट होणार नाही. पण तरीही सदाशिव लोखंडे यांना मात्र आत्मविश्वास मिळाल्याचं दिसत आहे.
 
मतदारसंघाचा इतिहास
पूर्वीच्या कोपरगाव मतदारसंघातून परिसीमन आयोगानुसार (सीमांकन) 2008 मध्ये शिर्डी या नव्या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यापूर्वीपर्यंत म्हणजे 2004 पर्यंत या मतदारसंघावर (कोपरगाव) प्रामुख्यानं बाळासाहेब विखे पाटलांचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं.
 
बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचं लोकसभेमध्ये तब्बल 7 वेळा प्रतिनिधित्व केलं. त्यापैकी 6 वेळा ते काँग्रेसकडून आणि एक वेळा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
 
पण 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरच्या पहिल्या म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं याठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजयही झाला होता.
 
रिपाइं आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण आघाडीचा पाठिंबा असूनही त्यांचा जवळपास सव्वा लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव झाला होता.
 
नंतर 2014 ला शिवसेनेनं सदाशिव लोखंडेंच्या रूपानं उमेदवार बदलला. त्यामुळं नाराज वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. पण शिवसेनेकडंच हा मतदारसंघ राहिला आणि लोखंडेंचा सलग दोन वेळा विजय झाला.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
सदाशिव लोखंडे यांना 2014 नंतर 2019 मध्येही सलग दुसऱ्यांदा लोकसभेत शिर्डी मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. महायुतीकडून शिवसेनेनं 2019 मध्ये सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी कायम ठेवली होती.
 
तर विरोधातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनं लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देत आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. पण लोखंडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत शिवसेनेचा मतदारसंघावरचा वरचष्मा कायम ठेवला.
 
2019 मध्ये लोखंडे यांना 4,86,820 तर कांबळे यांना 3,66,625 मतं मिळाली. लोखंडे यांनी जवळपास सव्वा लाख मतांच्या मताधिक्यानं मतदारसंघात विजय मिळवला होता.
 
विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रभाव अधिक असल्याचं पाहायला मिळतं. पण तरीही गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेनं या आव्हानाचा अगदी चांगल्या प्रकारे सामना केला आणि मतदारसंघ ताब्यात ठेवला.
 
चार वर्षांत बदलली परिस्थिती
शिर्डीच काय पण संपूर्ण राज्यातील मतदारसंघांमधली समीकरणं ही गेल्या चार वर्षांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. आधी मविआचा प्रयोग आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट ही त्याची प्रमुख कारणं.
 
एकीकडे मविआच्या प्रयोगानं तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एक आले. पण त्याचवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळं एका रात्रीत राज्यामध्ये दोन नवे पक्ष निर्माण झाले. प्रत्येक शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट आता पाहायला मिळत आहेत.
 
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी असलेले खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेतील फुटीनंतर सत्ताधारी बाजूने म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
 
त्यामुळं शिवसेनेतून नाराज होऊन गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा काँग्रेसचा हात सोडला आणि उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधलं.
 
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनंही त्यांना तिकिट देत बंडखोरी केलेल्या लोखंडेंसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.
 
महायुतीत उमेदवारीचा लढा
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं वर्णन कायम इच्छुकांची भाऊगर्दी असलेला मतदारसंघ असं करणं वावगं ठरणार नाही. दरवेळी या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणवर उमेदवार लोकसभेसाठी इच्छुक असतात.
 
ही निवडणूकही त्याला अपवाद नाही. शिवसेनेनं बुधवारी सकाळीच यादी जाहीर करत भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
पण त्यापूर्वी याठिकाणाहून महाविकास आघाडीतील इतरही अनेक नेते इच्छुक असल्याचं समोर आलं होतं. उमेदवारी जाहीर झाल्यानं आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.
 
पण महायुतीच्या उमेदवाराची घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. शिवसेनेचा विद्यमान खासदार असला तरी भाजपनं या मतदारसंघावर दावा केल्याचं पाहायला मिळालं. त्यात आठवलेंनीही उमेदवारीसाठी उडी घेण्याचा प्रयत्न केला होता.
 
यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातून अचानकपणे मनसेची दावेदारी समोर आली आहे. राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतली त्यावळी शिर्डी मतदारसंघाची मागणी केली अशा चर्चा आहेत.
 
विशेष म्हणजे बाळा नांदगावकर इथून मैदानात उतरणार या चर्चांनाही बळ मिळालं आहे. मनसेकडून मात्र अद्याप तसं काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. फक्त महायुतीत तीन जागांची मागणी केल्याचं नांदगावकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळं हा मतदारसंघ नेमका कुणाला जाणार आणि उमेदवार कोण असणार याकडंच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
 
शिंदे गटाकडं हा मतदारसंघ राहिला तर याठिकाणी थेट शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होऊ शकते किंवा मनसेला जागा मिळाल्यास उद्धल ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशीही लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती