भाजपाचे प्रभारी ठरले, महाराष्ट्रासाठी तिघांची नावे

गुरूवार, 28 मार्च 2024 (08:47 IST)
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकांना अतिशय गांभीर्याने घेतलं जात आहे. त्यामुळेच, एकेक जागेवरील उमेदवारासाठी महायुतीत सातत्याने चर्चा आणि सखोल मंथन होत आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देत नावांची घोषणा केली जात आहे. तसेच, उमेदवाराच्या नावांच्या घोषणेनंतरही नाराज पक्षाला आणि नेत्यांना समाजवण्याचा प्रयत्न होत आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, स्मृती इराणी यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीचे बडे नेते आहेत. आता, भाजपाने निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील प्रभारी आणि सहप्रभारींची नावे जाहीर केली आहेत.
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मान्यतेनुसार आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विविध राज्यात प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रात तीन जणांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी खासदार डॉ. दिनेश शर्मा यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे. तर, सहप्रभारी म्हणून निर्मलकुमार सुराणा आणि जयभानसिंह पवैय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, नुकतेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले खासदार डॉ. अजित गोपछडे यांना मणीपूर राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातच प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून तिघांची नेमणूक केली आहे. इतर राज्यात एक किंवा दोन जणांना जबाबदारी देण्यात आली आहे.
 
भाजपाचे ४० स्टार प्रचारक
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Edited by Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती