सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपाला सोडल्यामुळे त्या बदल्यात आम्हाला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. भाजपाने तसे आश्वासन आम्हाला दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील 10 जागांवर दावा सांगितला होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या हातात बारामती, शिरूर, रायगड, उस्मानाबाद या चार जागा आल्या आहेत. परभणीच्या जागा महादेव जानकर यांना देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या माघारीमुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे राहील याची शाश्वती राहिलेली नाही. अशातच राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद असलेली सातारची जागा भाजपाकडे गेली आहे. या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.