भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. तर त्यानंतर काँग्रेसकडून कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेसने ही यादी जाहीर केली असून त्यात रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच लढत होणार आहे. पुण्याच्या या लढतीत मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी देखील रंगत आणली आहे. पुण्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुण्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे.
राज्यात सध्या बारामती पाठोपाठ पुण्याची निवडणूक चर्चेची झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपा आणि काँग्रेसकडून जाहीर झालेले उमेदवार. भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या नावाला भाजपातूनच बऱ्यापैकी विरोध होता. तर दुसरीकडे भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसब्याच्या जागेवर निवडणूक लढवत जिंकून आलेल्या रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. धंगेकर यांच्या प्रचारात एक गमतीशीर गोष्ट समोर आली. आणि त्यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासोबतचा रवींद्र धंगेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोवर जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा, मी पुणेकर, असं म्हटलं आहे. त्यावरून आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. हा फोटो नेमका कोणी बनवला हे समोर आले नसले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हा फोटो व्हायरल करण्यात येत आहे.