चंद्रहार पाटील, वसंत मोरे, पंजाबराव डख यांच्यासह 'या' उमेदवारांचं झालं डिपॉझिट जप्त

शुक्रवार, 7 जून 2024 (13:36 IST)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. सांगलीची विशाल पाटील यांची अपक्ष जागा पकडून महाविकास आघाडीला राज्यात एकूण 31 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. या निवडणुकीत काही उमेदवार असे आहेत ज्यांची निवडणुकीत चर्चा रंगलेली होती. पण, आता निकालानंतर या उमेदवारांचे डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम जप्त झालेली आहे. डिपॉझिट जप्त झालेले चर्चेतले चेहरे कोण आहेत? त्यांना किती मतं मिळाली हे तर आपण पाहूयात. पण त्याबरोबरच डिपॉझिट म्हणजे काय? आणि ते का जप्त केलं जातं? याची माहिती घेऊया.
 
निवडणूक अनामत रक्कम (Security Deposit) म्हणजे नेमकं काय?
निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवाराला त्यांच्या जिल्ह्यात किंवा ज्या ठिकाणी निवडणूक आहे तिथं निवडणूक आयोगानं एक अधिकारी नेमलेला असतो त्या अधिकाऱ्याकडे एक विशिष्ट रक्कम जमा करावी लागते त्याला अनामत रक्कम म्हणतात. हे पैसे रोख स्वरुपात किंवा उमेदवाराच्या नावानं सरकारी तिजोरी पैसे जमा केल्याची पावती निवडणूक अर्जासोबत जोडायची असते. पण, ही अनामत रक्कम का जमा केली जाते? तर प्रामाणिकपणे निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज दाखल करावे, इतर कोणीही अर्ज दाखल करू नये यासाठी ही अनामत रक्कम घेतली जाते.
 
कोणत्या निवडणुकीसाठी किती डिपॉझिट?
सर्व निवडणुकांसाठी ही अनामत रक्कम सारखीच असते का? तर नाही. प्रत्येक निवडणुकांनुसार अनामत रक्कम बदलत असते. 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 25 हजार रुपये अनामत रक्कम निवडणुकीचा अर्ज भरताना द्यावी लाते. पण, उमेदवार जर अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा असला तर त्यांना या रक्कमेतून 50 टक्के सूट देण्यात आली आहे. म्हणजे या समाजातील उमेदवाराला फक्त 12500 रुपये अनामत रक्कम भरावी लागते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही लोकसभेसारखीच अनामत रक्कम द्यावी लागते. विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम ठरवून दिलेली आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांना 5 हजार रुपये भरावे लागतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत देखील 15 हजार रुपयांची अनामत रक्कम द्यावी लागते.
 
डिपॉझिट जप्त का केलं जातं?
पण, निवडणुकीनंतर काही उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त होत असते. मग डिपॉझिट जप्त होणे म्हणजे नेमकं काय? 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, उमेदवाराला एकूण वैध मतांच्या 1/6 मतं मिळाले नसतील तर अशा उमेदवारांचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जातं. ज्या उमेदवारांना 1/6 मतं मिळतात त्यांचं डिपॉझिट निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परत केलं जातं.
एखाद्या उमेदवाराचा निवडणुकीच्या आधी मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल तर अशा उमेदवाराचं सिक्युरीट डिपॉझिट परत केलं जातं.
एकच उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असेल आणि त्या उमेदवाराला एकूण मतांच्या 1/6 मतं मिळाली असतील तरी त्याला फक्त एक अनामत रक्कम परत केली जाते. इतर मतदारसंघातील अनामत रक्कम जप्त केली जाते. अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा असतो. यावेळी या अर्जात तुम्ही इतर मतदारसंघातून निवडणूक लढली होती का? असा प्रश्न विचारला जातो. जर दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढली असेल तर त्या मतदारसंघातल्या अनामत रकमेसाठी अर्ज केला नाही असं त्या उमेदवाराला जाहीर करावं लागतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात जवळपास 91 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघात 1121 उमेदवार रिंगणात होते. यापैकी 1025 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. बीडमध्ये सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियानं माहिती दिली आहे. पण, या डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांमध्ये चर्चेतले चेहरे कोण आहेत? तर पहिला उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील.
 
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त का झालं?
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं कॅडर आहे. इथं वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं वर्चस्व आहे. ही जागा नेहमी काँग्रेसकडेच राहिली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसमधून वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील आग्रही होते. काँग्रेस हायकमांडकडून सुद्धा विशाल पाटलांना ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, उद्धव ठाकरे शेवटपर्यंत या जागेसाठी अडून बसले. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणला. इतकंच नाहीतर त्यांनी परस्पर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवार घोषित करून टाकली. शेवटी विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी सभा घेतल्या. पण, शेवटी निवडणुकीचे निकाल आले तेव्हा चंद्रहार पाटील लाखभर मतं देखील घेऊ शकले नाहीत. त्यांना फक्त 60860 मतं मिळाली. त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलं यश मिळालं असलं तरी सांगली मात्र त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आहे. पण, या मतदारसंघातून अपक्ष विजयी झालेले विशाल पाटील यांनी आपण काँग्रेससोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भविष्यात ते महाविकास आघाडीचा हिस्सा असण्याची शक्यता आहे.
 
शांतिगिरी महाराज यांना किती मतं मिळाली?
चंद्रहार पाटलांनंतर डिपॉझिट जप्त होणारा चर्चेतला चेहरा म्हणजे शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून शेवटपर्यंत उमेदवार फायनल झाला नव्हता. एकनाथ शिंदे हेमतं गोडसे यांचं तिकीट कापून ते शांतिगिरी महाराज यांना देतील अशी चर्चा होती. शांतिगिरी महाराजांना भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. पण, या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही दावा होता. ज्या पक्षाकडून तिकीट मिळालं तिथून शांतिगिरी महाराज यांची लढायची तयारी होती. शेवटी शिंदेंनी हेमंत गोडसे यांना या मतदारसंघातून पुन्हा संधी दिली. पण, शांतिगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरला. नाशिक भागात त्यांचा भक्त परिवार अधिक आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी मतं विभागली जातील अशी भिती होती. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. पण, शांतिगिरी महाराज निवडणूक लढले. आता त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असून त्यांना वंचितच्या उमेदवारापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. वंचितचे उमेदवार करण गायकर यांना 47 हजार मतं मिळाली, तर शांतिगिरी महाराज यांना 44524 मतं मिळाली आहेत. शांतिगिरी महाराज यांनी 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढले होते. पण, त्यावेळीही त्यांच्या पदरी निराशा आली होती.
 
आंबेडकर वगळून वंचितच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार वंचितचे आहेत. वंचित बहुजन आघाडीनं एकूण 34 उमेदवार रिंगणात उतरवले होते. यापैकी खुद्द प्रकाश आंबेडकर यांना पावणेतीन लाखांच्या घरात मतं मिळाली असून ते अकोला लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राहिले. खरी लढत भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसच्या अभय पाटलांमध्ये झाली. पण, आंबेडकरांना मिळालेल्या मतांचा अभय पाटलांना फटका बसल्याचं इथं दिसतंय. दुसरीकडे हिंगोलीत डॉ. बी. डी. चव्हाण यांना दीड लाखांच्या जवळपास मतं घेता आली. पण, त्यांचंही डिपॉझिट जप्त झालं. प्रकाश आंबेडकर वगळता वंचितच्या सगळ्या 33 उमेदवारांचं डिप़ॉझिट जप्त झालं.
 
वसंत मोरे यांचं डिपॉझिट जप्त
वंचितच्या उमेदवारांमधला डिपॉझिट जप्त होणारा चर्चेतला पहिला चेहरा म्हणजे पुण्याचे वसंत मोरे. ते सोशल मीडियावरून नेहमी चर्चेत असतात. तसेच पुण्यातही त्यांची चांगली चर्चा असते. वसंत मोरे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक होते. ते पुण्यात मनसेचे पदाधिकारीही होते. पण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांनी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का याची चाचपणी केली. पण, पुण्याची जागा काँग्रेसला सुटली आणि रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली. वसंत मोरे चर्चेतला चेहरा असल्यानं भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली. पण, वसंत मोरे फक्त तिसऱ्या स्थानापर्यंत उडी मारू शकले. इतकंच नाहीतर या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं. त्यांना 50 हजार मतांचा आकडाही गाठता आला. फक्त 32 हजार मतांवर समाधान मानावं लागलं.
 
पंजाबराव डख यांचंही डिपॉझिट जप्त
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख परभणी लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली होती. आपली शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता असल्यानं विजय आपलाच होईल, असा दावा पंजाबराव डख करत होते. तसेच शेतकऱ्यांमध्ये चांगली ओळख असल्यानं आणि ते मराठा चेहरा असल्यानं पंजाबराव डख महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचं ‘राजकीय हवामान’ बिघडवणार का? अशी चर्चा होती. पण, प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा विजयाचा दावा करणाऱ्या डख यांना लाखभर मतं सुद्धा घेता आली नाहीत. परभणीकरांनी फक्त विजयी उमेदवार संजय जाधव आणि महादेव जानकर यांचं डिपॉझिट सुरक्षित ठेवलं आहे. पंजाबराव डख यांच्यासह तब्बल 31 उमेदवारांच डिपॉझिट जप्त झालं आहे.
 
शिर्डीतून वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांचंही डिपॉझिट जप्त
वंचित बहुजन आघाडीनं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यातील लढत तिरंगी होईल अशी चर्चा होती. दोन्ही शिवसेनेच्या भांडणात वंचितचा लाभ होईल असंही बोललं गेलं. उत्कर्षा रुपवते तिसऱ्या स्थानावर राहिल्या. इतकंच नाहीतर त्यांना लाखभर मतांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यांना 90 हजार मतं मिळाली असून त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. वंचितचे हे काही चर्चेतले चेहरे होते त्यांच्यासह इतर 33 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे
 
प्रकाश शेंडगेंचं सांगलीतून डिपॉझिट जप्त
मराठा समाजातील लोकांना कुणबी सर्टीफिकेट देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारनं घेतला तेव्हा या निर्णयाला विरोध झाला. विरोध करणाऱ्यांमध्ये छगन भुजबळ यांच्यासह प्रकाश शेंडगे आघाडीवर होते. त्यांनी मुंबईतही आंदोलन केलं होतं. या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात पुन्हा आगमन केलं होतं. प्रकाश शेंडगे यांना राजकीय वारसा लाभलाय. त्यांचे वडील शिवाजीराव शेंडगे यांनी कवठेमहांकाळ विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच ते राज्यमंत्रीही होते.
 
Published By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती