रवींद्र जडेजाची बायको रिवाबा भाजप खासादार आणि महापौरांना ‘औकातीत रहा’ असं का म्हणाली?
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (22:50 IST)
सध्या सोशल मीडियावर रिवाबा जडेजाचा एक व्हीडिओ व्हायरल होताना दिसतोय. रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगर उत्तर मतदार संघाच्या भाजप आमदार आहेत. या व्हीडिओत रिवाबा जडेजा जामनगरच्या खासदार पूनम मॅडम आणि जामनगरच्या महापौर बिनाबेन कोठारी यांच्यात वाद झाल्याचं दिसतंय.
व्हीडिओमध्ये रिवाबा खासदार आणि महापौरांशी वाद घालताना दिसत आहेत. व्हीडिओमध्ये रिवाबा "औकातीत रहा" आणि "आवाज कमी कर" असा दम देताना दिसत आहे.
त्याचवेळी खासदार पूनम मॅडम आणि महापौरही रागाने लालबुंद झाल्याचं दिसतंय. मात्र नंतर या व्हीडिओमध्ये खासदार 'सॉरी' म्हणतानाही ऐकू येत आहेत.
रिवाबा या क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नी आहेत.
नेमकं काय घडलं?
शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जामनगर महापालिकेने 'मेरी मिट्टी मेरा देश' अंतर्गत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमाला खासदार पूनम मॅडम, जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा जडेजा आणि महापौर बिनाबेन कोठारी उपस्थित होत्या.
दरम्यान या तिघींमध्ये वादावादी झाली, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
या भांडणात खासदार आणि महापौर एका बाजूला तर आमदार रिवाबा जडेजा दुसऱ्या बाजूला असल्याचं चित्र दिसतंय.
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये रिवाबा यांनी औकात आणि आवाज कमी कर असे शब्द उच्चारताच खासदार पूनम मॅडम आणि महापौर बिनाबेहन कोठारी यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
व्हायरल व्हीडिओमधील काही शब्द स्पष्टपणे ऐकू येत नाहीत कारण आजूबाजूने मोठ्याने आवाज येतोय. पण व्हीडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे या तिघींमध्ये काही कारणावरून भांडण झाल्याचं दिसत होतं.
रिवाबा यांच्या अशा वक्तव्यानंतर महापौर बिनाबेहन म्हणतात, तुम्ही इथून निघून जा.
यानंतर खासदार पूनम मॅडमही रिवाबा यांना सांगतात, "त्या महापौर आहेत. आणि वयानेही तुमच्या पेक्षा मोठ्या आहेत."
रिवाबा यांची प्रतिक्रिया
या व्हीडीओवर प्रतिक्रिया देताना रिवाबा यांनी या घटनेसाठी थेट खासदार पूनम मॅडम यांनाच जबाबदार धरलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, "कार्यक्रम सुरळीत सुरू होता. शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण करताना खासदारांनी चप्पल घातली होती. त्याच्यानंतर माझी पाळी होती. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी मी चप्पल काढली तेव्हा खासदार म्हणाल्या की, काही अडाणी लोकांना समजतच नाही. असे लोक ओव्हर स्मार्ट होऊन आपल्या चपला काढतात. मोठे मोठे नेते देखील असं करत नाहीत. शहीदांच्या कार्यक्रमात सुरू असलेली ही टीका मला आवडली नाही."
रिवाबा यांनीे प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दावा केला की त्यांनीच चपला काढून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. त्याआधी पूनम मॅडमने चप्पल न काढता श्रद्धांजली वाहिली होती, त्यामुळे रिवाबा यांनी चपला काढल्याचा त्यांना राग आला.
रिवाबा आणि खासदार पूनम मॅडम यांची चर्चा सुरू असताना महापौर बिनाबेन यांनी खासदाराची बाजू घेण्यास सुरुवात केली. त्यावर रिवाबा रागाने महापौरांना काहीतरी बोलतात.
रिवाबांच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा कोणी तुमच्यासमोर मोठ्याने बोलतो, तेव्हा साहजिकच तुम्हाला अपमानास्पद वाटतं. त्यामुळेच माझा स्वाभिमान जपण्यासाठी मला हे म्हणावं लागलं. कारण महापौरांचा आणि या घटनेचा काही संबंध नव्हता. त्यांच्याकडे बोलण्यासारखंही काही नव्हतं. तरीही त्या मध्येच आल्या आणि खासदाराची बाजू घेऊ लागल्या."
यावर खासदार आणि महापौर काय म्हणाल्या?
दुसरीकडे, या संपूर्ण घटनेवर महापौर बिनाबेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय असून त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही."
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार पूनम मॅडम म्हणाल्या, "हा सरकारी कार्यक्रम होता आणि माझी वागणूकही पक्षशिस्तीला अनुरूप होती. मी पक्षाची शिस्त मोडलेली नाही. प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेऊन मी तुमच्याशी बोलत आहे. ग्रुप फोटोसाठी एकत्र आल्यावर अर्ध्या मिनिटाचा हा संवाद झाला. त्यापलीकडे कुठलाही संवाद झाला नाही. कुठेतरी गैरसमज झालाय असं वाटतंय."
व्हीडिओमध्ये खासदार पूनम मॅडम सॉरी म्हणताना दिसल्या. त्यांना सॉरी म्हणण्याची गरज का वाटली असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "मी महापौर बिनाबेन यांना सॉरी म्हणाले कारण माझ्या उपस्थितीत वातावरण थोडं तणावपूर्ण होतं आणि बिनाबेन माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. त्यांना सॉरी म्हणायला काहीच हरकत नाही म्हणून मी सॉरी म्हणाले. रिवाबाला सॉरी म्हणाले कारण सार्वजनिक ठिकाणी जे घडलं ते मला आवडलं नाही. त्यामुळे तिथून निघणं योग्य होतं असं मला वाटलं."
पूनम मॅडम म्हणाल्या की, "रिवाबा पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत आणि हे माध्यमांसमोर घडलं, त्यामुळे मला ते आवडलं नाही."