शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. संसदेत शुक्रवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा ही जाहीर टीका केली आहे.बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, जनताच सर्वोच्च आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेनेने दिल्याने अविश्वास प्रस्तावात शिवसेनेची भूमिका काय असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार असून या ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला असून . सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला जोरदार फटकारले आहे. यावरून असे दिसते की शिवसेना भाजपा वर नाराज आहे. काय आहे अग्रलेख वाचा पुढीलप्रमाणे :
जगात आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो. ठीक आहे, पण त्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने आमच्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारातून सोडवलेले नाही. नाणारमधील रिफायनरीचे गॅस चेंबर रोखा असे ओरडून सांगणाऱ्या जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी ही अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू. ज्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत गरीबांना, बेरोजगारांना स्थान नाही ती अर्थव्यवस्था काय कामाची! येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे ‘कसाई’ राज्य करतात. सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे!
लोकसभेत मोदी सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर चर्चेचा गडगडाट होईल. आरोप-प्रत्यारोपांच्या विजा कडाडतील. शेवटी पंतप्रधान मोदी हे कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकल्याच्या थाटात नेहमीच्या पद्धतीने भाषण करतील. भाजपकडे आकडय़ांचे बहुमत आहे. त्यामुळे मतदानानंतर सरकार पडेल असा विचार कोणी करीत नाही. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे, ‘आकडा आमच्याकडेही आहे.’ राजकारणात सैन्याचा आत्मविश्वास जागविण्यासाठी अशा गर्जना कराव्या लागतात. सरकार पाडण्याइतका आकडा आपल्याकडे नाही हे विरोधकांना माहीत आहे, पण विरोधकांनी आणलेला हा अविश्वास ठराव सरकार पाडण्यासाठी नसून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची सालटी काढण्यासाठी आहे. संसदेत सरकारवर हल्लाबोल होईल व त्या आरोपांना तीच बुळबुळीत उत्तरे देऊन बाकडी वाजवून घेतली जातील. त्यामुळे लोकशाही मूल्यांचे नेहमीप्रमाणे जतन वगैरे होईल. मुळात सध्या बहुमताचा अर्थ लोकभावनांची कदर असा नसून बहुमतवाल्यांची दडपशाही असा बनला आहे. लोकांना स्वप्ने दाखवायची. श्रद्धा आणि भावनांना हात घालून मते मागायची व लोकांनी एकदा भरभरून मतदान केले की हे सर्व चुनावी जुमले कधीही स्वच्छ न होणाऱ्या गंगेत बुडवून टाकायचे. जाहीर सभांना होणारी गर्दी व त्यातून उठणाऱ्या उन्मादी आरोळय़ा म्हणजेच राज्य करणे असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. मुळात सध्याच्या सरकारने जे बहुमत किंवा विश्वास प्राप्त केला तोच संशयास्पद आहे. ज्या विजयावर प्रश्नचिन्ह आहे त्यांनी बहुमताची भजने गाऊ नयेत. प्रचंड पैसा, सत्तेची दडपशाही आणि मतदान यंत्रांची हेराफेरी हीच विजयाची त्रिसूत्री असेल तर लोकशाहीचे फक्त बुजगावणेच आपल्या देशात उभे आहे व या बुजगावण्याच्या अस्तित्वासाठी लढाईचा खणखणाट आता सुरू आहे.