सांस्कृतिक कलादर्पणची "नांदी"

बुधवार, 11 मार्च 2020 (14:03 IST)
यंदाच्या वर्षांपासून चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत कलाकार आणि त्यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी सांस्कृतिक कलादर्पण च्या वतीने गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहेत. मालिका, चित्रपट,शॉर्ट फिल्म, न्यूज चॅनेल आणि व्यावसायिक नाटक या पाच विभागात हे पुरस्कार विभागले गेले असून या पाचही विभागातील सर्वोत्कृष्ट अशा कलाकृतींचा सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्याच्या पहिल्याच वर्षी व्यावसायिक नाटक विभागात रंगभूमीवर गाजत असलेली  तब्बल २२ व्यावसायिक नाटकांनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला होता.

या २२ कलाकृतींपैकी ७ नाट्यकलाकृतींची निवड शिरीष घाग, भालचंद्र कुबल, रविंद्र आवटी आणि महेश सुभेदार या मान्यवर परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी केली. प्लँचेट, आमने सामने, झुंड,ह्यांच  करायचं काय, थोडं तुझं थोडं माझं, सर प्रेमाचं काय करायचं आणि हिमालयाची सावली या ७ नाटकांचा नाट्यमहोत्सव येत्या १६ मार्च ते २० मार्च दरम्यान प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे पार पडणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते या नाट्यमहोत्सवाचे उदघाटन होणार आहे . तसेच या नाट्य विभागाची संपूर्ण नामांकने लवकरच जाहीर होणार आहेत त्याचबरोबर चित्रपट महोत्सवाची तारीख व १० सर्वोत्कृष्ट सिनेमाची घोषणा लवकरच जाहिर करण्यात येईल असे अध्यक्ष संस्थापक  चंद्रशेखर सांडवे यांनी कळवले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती