महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांचं हे यश आणखी विशेष ठरतं, कारण कोव्हिडच्या साथीच्या काळात ही मोहीम त्यांनी पार पाडली आहे. लॉकडाऊनची अनिश्चितता, तयारीसाठी मिळालेला मर्यादित वेल, कोरोना विषाणूची भीती, अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे.
गिरीप्रेमीनं सर केलेलं हे आठ हजार मीटर उंचीवरचं आठवं हिमशिखर ठरलं आहे. याआधी 2012 साली गिरीप्रेमीनं एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर ल्होत्से, मकालू, च्यो ओयू, धौलागिरी, मनास्लू आणि कांचेनजुंगा ही शिखरंही त्यांनी सर केली आहेत.