एल्विश यादव : रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचा आरोप करण्यात आलेला हा युट्यूबर कोण आहे?
शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (19:05 IST)
एल्विश यादव या युट्यूबरवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली आहे. एल्विश आणि त्याच्यासह सात जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा एफआयआर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात घटनास्थळी 9 सापही आढळले होते. हा एफआयआर वन्यजीव संरक्षण कायदा,1972 नुसार दाखल झाला असून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार मेनका गांधी यांच्या पीएफए संस्थेच्या तक्रारीनंतर तो दाखल करण्यात आला.
एफआयआरमध्ये ही संस्था म्हणते, 'आम्हाला एल्विश यादव नावाचा युट्यूबर सापाचं विष आणि जिवंत साप घेऊन आपल्या टोळक्यासह नोएडामध्ये फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि व्हीडिओ शूट करतो. तिथं परदेशी युवतींना बोलावलं जातं त्यांच्यासह सापाचं विष तसेच इतर नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जातं. '
एल्विशने हे आरोप फेटाळले आहेत.
बिग बॉस OTT सिझन 2 चं विजेतेपद एल्विश यादव या युट्यूबरने पटकावलं होतं. या निमित्ताने बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड एन्ट्रीच्या माध्यमातून स्पर्धेत दाखल झालेल्या एखाद्या स्पर्धकाने विजेतेपदाचा किताब आपल्या नावे केला होता.
एल्विश यादव कोण आहे?
एल्विश यादव हा एक चर्चित युट्यूबर आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असल्याचं दिसून येतं.
युट्यूबवर त्याचे 1 कोटी 60 लाखांपेक्षाही जास्त फॉलोवर आहेत, तर इन्स्टाग्रामवर हीच संख्या 1 कोटी 30 लाखांच्या घरात आहे.
युट्यूबवर एल्विश यादवचे दोन चॅनेल आहेत. त्यामध्ये एका चॅनेलचं नाव एल्विश यादव असं असून दुसऱ्या चॅनेलचं नाव आहे एल्विश यादव व्लॉग्स.
एल्विश यादव हा युट्यूबवर विनोदी व्हीडिओ बनवण्यासाठी ओळखला जातो. त्याचे रोस्टिंग व्हीडिओही प्रचंड लोकप्रिय असतात.
आपली हरयाणवी बोली आणि विशिष्ट शैली यांच्यामुळे त्याने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. याव्यतिरिक्त एल्विश गाणेही गातो. तसंच अभिनयही करतो.
14 सप्टेंबर 1997 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम येथे जन्मलेल्या एल्विश यादवने 2016 मध्ये आपलं युट्यूब चॅनेल पहिल्यांदा सुरू केलं होतं.
त्याने दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. सुरुवातीला एल्विशचं नाव सिद्धार्थ यादव असं होतं. पण आपल्या मोठ्या भावाच्या इच्छेमुळे त्याने स्वतःचं नाव एल्विश यादव असं बदलून घेतलं.
युट्यूबवर एल्विश बनवत असलेल्या व्हीडिओंना लवकरच मोठी प्रसिद्धी मिळाली.
एल्विशला चारचाकी गाड्यांचा छंद असून त्याच्याकडे अनेक लक्झरी वाहनं असल्याचं म्हटलं जातं.
सिझन 2 चं वैशिष्ट्य
टीव्हीवर बिग बॉसच्या सर्व सिझनचा होस्ट असलेला सलमान खान यंदाच्या वेळी पहिल्यांदाच बिग बॉस OTT चा होस्ट बनला होता.
पहिल्या सिझनवेळी याचा होस्ट होता करण जोहर.
पण यंदा सलमान खान हा या शोचा भाग असल्यामुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचं दिसून आलं.
यावेळी बिग बॉस OTT शोमध्ये युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचं वर्चस्व दिसून आलं.
या सिझनमध्ये निर्मात्यांनी या इन्फ्लुएन्सर्सना खूपच महत्त्व दिलं होतं.
बिग बॉस OTT च्या यंदाच्या सिझनमध्ये अनेक युट्यूबर पाहुणे म्हणून आले होते. खरं तर हा शो सोशल मीडिया इन्फुएन्सर्सनाच समर्पित असल्याचं प्रकर्षाने दिसून आलं. त्यामुळेच त्यांच्याशिवाय इतर कुणी विजेत बनणार नाही, असा अंदाज सर्वांना होता.
टॉप 3 मध्ये पोहोचणारेही इन्फुएन्सरच होते, यावरूनही याचा अंदाज येऊ शकतो.
याच कारणामुळे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्राशी संबंधित मोठे चेहरेही स्पर्धेत टिकू शकले नाहीत.
त्यातही अभिनेत्री पूजा भट्ट सर्वाधिक काळ यामध्ये टिकून राहिली. पण नंतर ती बाहेर पडली.
अनेक वेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी असं दर्शवण्याचा प्रयत्न केला की बिग बॉसने त्यांच्या सोशल मीडियावरील चाहत्यांना जोडून घेण्यासाठीच त्यांना शोमध्ये बोलवलं आहे.
अभिषेक मल्हार तर एके ठिकाणी म्हणाला की बिग बॉस शोला मी नवे प्रेक्षक दिले आहेत. त्यामुळे मी हा शो जिंकायला हवा.
याच कारणावरून या स्पर्धकांनी इतर स्पर्धकांना टोमणेही मारले आणि वादविवादही केला.
एकदा तर विकेंड शोदरम्यान सलमान खानने सुरुवातीला एल्विश आणि नंतर अभिषेक यांना जोरदार सुनावलं होतं.
भांडणं कमी, पण आरडाओरडा फार
बिग बॉसचा प्रत्येक सिझन आपल्या भांडणांमुळे चर्चेत राहिला आहे.
डॉली बिंद्राचं प्रत्येक गोष्टीवर भांडण असो, किंवा KRK चं भांडण असो. बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये कोणत्या ना कोणत्या पात्राचं जोरदार भांडण दिसून यायचं.
अनेक वेळा या भांडणातून मारामारी होईल, असंही वाटायचं. ती अनेकवेळा झालीही. या कारणामुळे अनेक जण बिग बॉसच्या घरातून बाहेरही पडले.
बिग बॉसचं सर्वात लोकप्रिय सिझन क्रमांक 13 मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम यांचं भांडण अनेकांना अजूनही लक्षात आहे.
पण यंदाच्या बिग बॉस OTT मध्ये भांडणं कमी झाली तरी आरडाओरडा प्रचंड झाला.
बेबिका याबाबत सर्व स्पर्धकांवर भारी ठरली. तिचं त्याला नुकसानही सोसावं लागलं. पण तरीही ती टॉप 4 पर्यंत पोहोचू शकली.
शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारा एल्विश यादव हा आपल्या बढाई मारण्याच्या सवयीमुळे आधीपासून वादग्रस्त आहे.
कदाचित यामुळेच त्याला बिग बॉसमध्ये एन्ट्री मिळाली. शो मध्ये येताच एल्विशची जीभही अनेकवेळा घसरली. त्यानेही अनेकवेळा मर्यादा सोडली.
बेबिकाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यही त्याने केलं. याच मुद्द्यावरून सलमान खानची बोलणीही त्याला खावी लागली.
मात्र, आपली चूक मान्य करून यापुढे तसं न करण्याचं वचन त्याने दिलं.
एल्विशने आपली चूक मान्य केली तरी बाहेरच्या जगात त्याच्या चाहत्यांनी सलमान खानचं मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं.
यानंतर सलमान खानने पुढच्याच शोमध्ये एल्विश यादवच्या सोशल मीडिया आर्मीवरून त्याला सुनावलं. आभासी जगाचं हे भ्रम खरं नाही, हे सलमानने त्याला समजावलं.
तरीही एल्विशचे चाहते थांबायचं नाव घेत नव्हते. त्यांनी दुप्पट उत्साहाने एल्विशला पाठिंबा देणं सुरूच ठेवलं.
आकांक्षा पुरी आणि जाड हदीद यांचं चुंबन
बिग बॉस OTT सिझन 2 मध्ये जाड हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी एकमेकांचं घेतलेलं चुंबन प्रचंड वादग्रस्त ठरलं.
आकांक्षा पुरी ही टीव्ही आणि मॉडेलिंकमधली चर्चित चेहरा आहे. आपल्या बिनधास्तपणासाठी तिला ओळखलं जातं.
एका टास्कदरम्यान आकांक्षा ही हदीदला किस करण्यास तयार झाली.
पण नंतर यावरून मोठा गदारोळ झाला. हदीद याने मर्यादा ओलांडल्या, असा आरोपही आकांक्षाने नंतर केला.
त्यानंतर सलमानने दोघांनाही फैलावर घेतलं.
यामुळे सर्वात जास्त तोटा आकांक्षाला झाला. ती शोमधून लवकर बाहेर पडली.
प्रेम की फिक्सिंग?
या शोमध्ये टीव्ही कलाकार अविनाश सचदेव आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड पलक हीसुद्धा दाखल झाली होती.
दोघे सुरुवातीपासून एकमेकांना टाळत होते. पण नंतर त्यांच्यात काही बोलणंही झालं. यानंतर दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण झाल्याचं दिसून आलं. याबाबत दोघांमध्ये पुन्हा मोकळेपणाने चर्चाही झाली.
पण पलकने स्पष्ट केलं की अविनाशला ती चांगला मित्र मानते. आता या नात्यासाठी पुन्हा तयार नसल्याचं तिने म्हटलं. पुढे पलक शोमधून लवकर बाहेर पडली.
शो दरम्यान, जिया शंकर आणि अभिषेक यांच्यातही जवळीकता निर्माण झाली होती. पण नंतर त्यांनीही आपण केवळ चांगले मित्र आहोत, असं स्पष्ट केलं.
दरम्यान, मनिषा राणी ही एल्विशच्या मागे लागली होती. पण ती थट्टा करत असल्याचं स्पष्टपणे कळू शकत होतं. पण मजेत हे प्रकरण काही वेळा गंभीरही बनल्याचं दिसून आलं.