हमास आणि अल-कसाम ब्रिगेड्सची सोशल मीडियावरील सदस्यसंख्या लाखोंनी कशी वाढली?

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (10:03 IST)
हमासच्या सैनिकांनी 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केलेला. या अभूतपूर्व हल्ल्यानंतर हमासच्या मीडिया रणनीतीमध्येही बदल झालाय.
 
2007 पासून गाझा पट्टीशी निगडीत हमासच्या मीडिया रणनीतीने महत्त्वाची भूमिका बजावलेय.
 
हमासने त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अनेकदा पारंपरिक माध्यमांचा वापर केलाय, परंतु मेसेजिंग अॅप टेलीग्रामच्या आगमनानंतर त्यांची मीडिया रणनीती बदललेय.
 
पॅलेस्टिनी संसदीय निवडणुका
2006 च्या पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकांमुळे वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्राधिकरण (PA) आणि गाझा पट्टीतील हमास यांच्यात मोठी फूट पडली, कारण हमासने पॅलेस्टिनी प्राधिकरणाचा मुख्य पक्ष फताहपेक्षा अधिक जागा जिंकल्या.
 
पॅलेस्टिनी प्रदेशातील राज्यकर्त्यांमधील मतभेदामुळे हमासला गाझामधील प्रसारमाध्यमांवर वर्चस्व मिळवण्यात यश आलं. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पारंपरिक माध्यमांवर विशेषत: अल-अक्सा टीव्हीवर अवलंबून होते.
 
2006 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी स्थापन झालेल्या अल-अक्सा टीव्हीने हमासच्या आशावादी आणि ध्येयवादी मोहिमेला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
अल-अक्सा टीव्हीने हमासच्या इस्लामिक समर्थकांचे संदेश प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेय. चॅनल नियमितपणे हमास आणि त्यांची सशस्त्र शाखा, इज्ज अल-दिन अल-कसाम ब्रिगेड्सच्या प्रचाराचे कार्यक्रम प्रसारित करतं.
 
इस्रायल विरुद्धच्या चळवळीत वेस्ट बँकमधील नेत्यांना पर्याय म्हणून पॅलेस्टिनींचे नेतृत्व करण्यासाठी हमास कसं सक्षम आहे हे सांगण्याचा प्रयत्न वेळोवेळी अल-अक्सा टीव्हीने केलाय.
 
2008, 2014, 2018 आणि 2021 मध्ये झालेल्या युद्धादरम्यान इस्त्रायलने अल-अक्सा टीव्हीच्या मुख्यालयावर बॉम्बफेक करूनही, चॅनलने वारंवार मोबाइल सुविधा आणि पर्यायी स्थानांना वापर करुन प्रसारण पुन्हा सुरू केलंय.
 
अल-अक्सा विरुद्ध अल-जझीरा
अल-अक्सा टीव्हीने 2018-2019 दरम्यान गाझा-इस्रायल सीमेवरील निषेध मोर्चांचे व्हीडिओ नियमितपणे प्रसारित केलेले.
 
प्रसारित केलेल्या व्हीडिओंमध्ये हमासचा गाझा येथील प्रमुख नेता याह्या सिनवारची भाषणे देखील होती. या आंदोलनाला 'ग्रेट मार्च ऑफ रिटर्न' असंही म्हटलं जातं.
 
कतार अनुदानित ‘अल जझीरा’ हे पॅलेस्टिनी प्रदेशात सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल आहे. पॅलेस्टिनी सेंटर फॉर पॉलिसी अँड सर्व्हे 2022 च्या अभ्यासानुसार दुसरा क्रमांक अल-अक्सा टीव्हीचा लागतो.
 
ऑनलाइन मीडिया नेटवर्क्सने हमासचे संदेश गाझा आणि अधिकाधिक पॅलेस्टिनी समुदायापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेय. यामध्ये 1997 मध्ये स्थापन केलेले पॅलेस्टिनी माहिती केंद्र आणि हमासशी संबंधित सर्वात जुन्या गोष्टींचा समावेश आहे.
 
हा गट 'सफा' आणि 'शहाब' या वृत्तसंस्था देखील चालवतो. या दोन्ही संघटना हमासची निवेदनं नियमितपणे प्रसारित करतात.
 
पॅलेस्टाईन वृत्तपत्र हे गाझामधील सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रातील मजकूर इस्रायलच्या विरोधातील हमासच्या संदेशाच्या प्रचाराचं काम करतो.
 
हमास आणि अल-कसाम ब्रिगेडच्या अधिकृत वेबसाइट्सच्या इंग्रजी आवृत्त्या देखील आहेत. या वेबसाइट्स हमास आणि त्यांच्या सशस्त्र शाखांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य माध्यम आहेत, परंतु दोन्ही वेबसाइट्स गाझा व्यतिरिक्त इंग्लंड आणि इजिप्तसारख्या देशांमध्ये पाहता येत नाहीत.
 
हमासशी संबंधित काही माध्यम संस्था इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये मजकूर प्रकाशित करतात, परंतु हा मजकूर प्रामुख्याने अरबी भाषेत असतो.
 
सोशल मीडियाचा वापर
2011 मध्ये अरब स्प्रिंग निषेध मोर्चादरम्यान सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. हमास आणि त्याच्याशी संलग्न माध्यमांनी प्रमुख सोशल मीडिया व्यासपीठांवर आपली पकड मिळवली. हमासने आपल्या अजेंडाचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. इस्रायलसोबतच्या संघर्षातच नव्हे तर हमासने गाझामध्ये केलेल्या प्रशासकीय कारवाईमध्येही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
 
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे हमास वेगवेगळ्या प्रकारच्या मजकुराची निर्मिती करू लागलाय. 'शत्रूला' म्हणजेच इस्रायलला संदेश देण्याच्या उद्देशाने आपल्या सैनिकांच्या प्रशिक्षणादरम्यान बनवलेले प्रोपगंडा व्हीडिओंचाही त्यात समावेश आहे.
 
हमासने हिब्रू भाषेत व्हीडिओ आणि गाणी प्रसारित करण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर केलाय. 2017 मध्ये, हमासने यूट्यूबवर हिब्रूमध्ये एक अॅनिमेटेड संगीत व्हिडिओ प्रकाशित केला. 'झायनिस्ट यु विल पेरिश इन गाझा' असं या व्हीडिओतं शीर्षक होतं. या व्हिडिओमध्ये हिंसाचार घडवून आणण्याबाबत इस्रायली सैन्याला धमकी देण्यात आली होती.
 
मात्र, नंतर हा व्हीडिओ काढून टाकण्यात आला. अलिकडच्या काळात फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया व्यासपीठांवरील हमासची जवळजवळ सर्व अधिकृत खाती आणि मीडियाशी संबंधित काही खाती काढून टाकण्यात आली आहेत.
 
हमासशी संबंधित खाती काढून टाकण्यासाठी इस्त्रायल ‘मेटा’शी चर्चा करत असल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत.
 
हमासच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीमध्ये घट झाल्यामुळे हमास टेलिग्रामसारख्या इतर व्यासपीठांकडे वळून नवीन रणनीती आखतोय.
 
हमास आणि अल-कसाम ब्रिगेड्स टेलिग्रामवर
हमास आणि अल-कसाम ब्रिगेड्सचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल 2015 मध्ये तयार केले गेले. गाझा मधील एक गट आणि इस्रायल यांच्यातील एका प्राणघातक संघर्षानंतर आठवडाभरातच हे चॅनल तयार करण्यात आलेले. तेव्हापासून या चॅनेलचा उपयोग प्रचाराचे व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करण्यासाठी केला जातोय.
 
दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हमास आणि अल-कसाम ब्रिगेड्स चॅनेलच्या सदस्यांची संख्या वेगाने वाढली आहे. टेलिग्राम चॅनल आणि टीजीस्टॅट या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढल्याचं दिसतंय.
 
हमासच्या टेलिग्राम चॅनेलचे 6 ऑक्टोबर रोजी जवळपास 41,000 सदस्य होते. 11 ऑक्टोबरपर्यंत ही संख्या 120,000 पर्यंत पोहोचली होती.
 
दुसरीकडे, अल-कसाम ब्रिगेड्स टेलिग्राम चॅनेलच्या सदस्यांची संख्या युद्धापूर्वी 200,000 होती, जी 11 ऑक्टोबरपर्यंत 580,000 पर्यंत पोहोचलेली. अल-कसाम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू ओबेदाह यांच्या टेलिग्राम चॅनेलनेही 395,000 सदस्य असल्याचा दावा केलाय.
 
अल-कसाम ब्रिगेडच्या टेलिग्राम चॅनेलने लोकप्रियतेमध्ये पश्चिम जॉर्डनच्या सर्वात प्रभावशाली सशस्त्र गटांच्या चॅनेललाही मागे टाकलंय. उदा. नॅब्लस स्थित ‘लायन्स डेन्स’ हे टेलिग्राम चॅनेल, ज्याचे सुमारे 253,000 सदस्य आहेत.
 
हमास टेलिग्राम चॅनेलची वाढती लोकप्रियता हा एका पद्धतशीर मीडिया स्ट्रॅटेजीचा परिणाम असल्याचं दिसतं. जसजसं हमासच्या सैनिकांनी आक्रमण सुरू केलं, अल-कसाम ब्रिगेड्सने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर मागील वर्षांमध्ये प्रकाशित केलेल्या व्हिडिओंपेक्षा चांगल्या दर्जाचे व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली.
 
यातील काही व्हीडिओ जसजश्या घटना घडत गेल्या त्याप्रमाणे ड्रोन किंवा गोप्रो कॅमेर्‍यांच्या साहाय्याने चित्रित केले गेलेत.
 
हे व्हीडिओ हमासच्या मीडिया विभागाने मोठ्या प्रमाणात शेअर केलेले. सदर व्हिडिओ फक्त अल-अक्सा टीव्हीवरच थेट प्रक्षेपित केले जात नव्हते तर सोशल मीडियावरही शेअर केले जात होते.
 
हमासतर्फे टेलिग्रामचा वापर म्हणजे इस्रायलच्या अजिंक्य राहण्याच्या कल्पनेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती