सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला जातो कीर्तीध्वज
मंगळवार, 21 मार्च 2023 (14:45 IST)
सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला जातो कीर्तीध्वज, जाणून घ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा!
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तश्रृंगी देवी. साडेतीन शक्तीपीठांना ॐ काराचे सगुण रूप मानतात. ओंकारात साडेतीन मात्रा आहेत. त्यातील अकार पीठ म्हणून माहूर ओखले जाते. उकार पीठ तुळजापूर, मकार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा म्हणजेच सप्तश्रृंगी. हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभनिशुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तश्रृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तश्रृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली. या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही पोहचलात की मन प्रसन्न होऊन जाते.
सप्तशृंग गडावर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
सप्तशृंग गडावर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. नऊ दिवस चालणार्या नवरात्र उत्सवाची सांगता नवमीच्या हवनाची पुर्णाहुती दुसर्या दिवशी दसर्याला देऊन होते. सप्तशृंगगडावरील शिखरावर ध्वज विजयादशमी या दिवशी सप्तशृंगीच्या शिखरावर दरेगावचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने ध्वज लावतात. विशेष म्हणजे देवीच्या शिखरावर चढण्यासाठी कोणताही मार्ग नाही. तरी देखील हे अवघड कार्य दरेगांवचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने करीत आहेत.
गवळी कुटुंबाला किर्तीध्वज फडकविण्याचा मान
सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी दरेंगाव असून येथील गवळी कुटुंबाला किर्तीध्वज फडकविण्याचा मान आहे. गवळी परिवारातील आजोबा रायाजी पाटील यांच्यापासून गडावर ध्वज लावण्यात येत आल्याचे गवळी कुटुंबीय सांगतात. तो ध्वज रेणूकादास महाराज यांचे वंशज व बेटावद गावातील आघार, ठेंगोडा, देवळा, कळवण, नांदुरी या मार्गाने पायी प्रवास करून शेवटी गडावर पोहचत. गडावर आल्यानंतर चैत्र शुध्द चतुर्दशीला रात्री ध्वज लावला जात असे. सध्या देवस्थान चा कारभार पाहण्यासाठी विश्वस्त संस्थेची स्थापना झाल्यापासुनच सदरचा ध्वज कार्यालयात जमा केला जातो.
असा असतो किर्तीध्वजाचा कार्यक्रम
विश्वस्त संस्थेमार्फत दरेगांवचे गवळी (पाटील) चैत्र शुध्द चतुर्दशी व अश्विन शुध्द नवमी असे वर्षातून दोन वेळेस शिखरावर ध्वज लावतात. हा ध्वज 11 मीटर केशरी रंगाच्या कापडाचा बनवण्यात येतो. तसेच ध्वजासाठी 10 फुट उंचीची काठी व सुमारे 20 ते 25 किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन ध्वजाचे मानकरी ध्वज लावतात. आजही रेणुकादास महाराजांचे वंशज बेटावद येथुन 1981 सालापासून पायी वारी करून ध्वज घेऊन येत असतात. बेटावद प्रमाणेच अनेक भाविक गडावर दर्शनासाठी येतांना लहान मोठे ध्वज घेऊन श्री भगवती मंदिराच्या परिसरात लावतात. त्यामुळे याञा उत्सव मंदिराच्या परिसरात ध्वजच ध्वज दिसतात.
मध्यरात्री फडकविला जातो ध्वज...
दसऱ्याच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री गवळी परीवार शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी 10 फुट लांब काठी, 11 मीटर केशरी कापडाचा ध्वज, पुजेसाठी गहु, तांदुळ, कुंकु, हळद तसेच झेंडा घेवून जाणाऱ्या मार्गातील विविध ठिक ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते. सप्तशृंगी गड समुद्र सपाटीपासून 4 हजार 500 फुट उंचीवर आहे. वर्षभरातून चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकविले जाते. या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही, सरळ शिखरावर जाणे म्हणजे मुत्युला आंमञण देणे असे आहे. मात्र तरीदेखील पाचशे वर्षांपासून ही परंपरा जोपासत आली असून यामध्ये कोणालाही अद्याप दुखापत झाली नसल्याचे भाविक सांगतात.