भारतीय जनता पक्षाचा नेता वरुण गांधी पुन्हा वादात अडकला आहे. वडील संजय गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून त्याने सक्तीची नसबंदी लागू करण्याचे मत व्यक्त केले आहे.
भाजपचा पिलभित मतदार संघातील उमेदवार असलेल्या वरुणने 'द टेलिग्राफ' दैनिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षात भारताला मजबूत नेतृत्व मिळाले नाही. आता मी वडील संजय गांधी यांच्यासारखे नेतृत्व देण्याचा प्रयत्न करेल. सक्तीची नसबंदी आणि सर्वांना सैन्य सेवा करण्याबाबतचे विधेयक संसदेत मांडेल. यामुळे देशाची अखंडता आणि एकात्मता कायम राहील. तसेच जाती, धर्मांमधील दरी कमी होईल.
वरुण गांधी यापूर्वी पिलभितमध्ये केलेल्या एका भाषणावरुन अडचणीत आले होते. त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई केली होती. आता सक्तीच्या नसबंदी विषयावरुन वरुण वादात येणार आहे. भाजपनेही याप्रकरणी अंग काढून घेतले आहे.