'युपीए'ला डाव्यांचे आशीर्वाद लागतीलच-पवार

लोकसभा निवडणुकीनंतर संयुक्त पुरोगामी आघाडीला (युपीए) आपली दारे डाव्यांसाठी उघडी ठेवावीच लागतील, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचा पंतप्रधानही निवडणुकीनंतर सर्वसहमतीने ठरविला जाईल, असे सांगितले. याचा अर्थ डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाला पवारांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पवार म्हणाले, की यावेळी सत्ता स्थापनेसाठी डाव्यांचे आशीर्वाद व पाठिंबा आम्हाला लागेल, असे मला वाटते. म्हणूनच डाव्यांशी चांगले संबंध ठेवा, असे मी अगदी सुरवातीपासूनच, युपीएतील आम्चाय घटक पक्षांना सांगतो आहे.

ते आम्हाला पाठिंबा देत होते. त्यांच्यामुळेच आम्ही स्थिर सरकार देऊ शकलो हे नाकारता येणार नाही. त्यामुळे त्याचे श्रेय त्यांनाही दिले गेले पाहिजे, असे सांगून डाव्यांनी कधीच सांप्रदायिक शक्तींना मदत केलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानपदाच्या मुद्यावर कॉंग्रेसशी मतभेद असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले. युपीएचा पंतप्रधान कोण असेल हे निवडणुकीनंतर ठरेल, असे ते म्हणाले. कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून मनमोहन सिंगांच्या उमेदवारीला आमचा आक्षेप नाही. पण युपीएचा पंतप्रधान निवडायचा असेल तर तो सर्वपक्षांच्या सहमतीनेच निवडला गेला पाहिजे, असे पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा