लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत अवघे ४१.२४ टक्के एवढेच मतदान झाले. मुंबईतील मतदानाचा हा १९७७ नंतरचा नीचांक आहे.
मतदान करण्याचा लोकांचा निरूत्साह दूर करण्यासाठी यावेळी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे यांच्यासह बॉलीवूडकर मंडळीही यात उतरली होती. मात्र, लोकांनी त्यांच्या आवाहनला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
हे १९७७ नंतरचे नीचांकी मतदान आहे. त्यावेळी मुंबईत पाचच मतदारसंघ होते. तरीही ६१.१७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा आकडा खाली येत गेला. तरी यावेळेएवढा तो कधीच खाली आला नव्हता.
हे मतदान एवढे कमी का झाले याची कारणमीमांसा करण्याचे काम आता सुरू झाले आहे. काहींच्या मते सुट्या आणि उन याला कारणीभूत ठरले. काहींच्या मते निरूत्साह हे एक कारण आहे. काही जण मात्र, मुंबईतील हल्ला रोखण्यात आलेले अपयश, मुंबईतील नागरी सुविधा सोडविण्यात अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी या सगळ्यांबद्दलची नाराजी या मतदान न करण्यातून व्यक्त झाल्याचे म्हटले जाते.