कॉग्रेस नेते माणिकराव गावित यांचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या अभिनेते जितेंद्र यांच्यावर आज जितेंद्र चौधरी नावाच्या भाजपच्या कथित कार्यकर्त्याने चप्पल फेकल्याने खळबळ उडाली.
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, कॉग्रेस नेते नवीन जिंदल, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आता चप्पल फेकलेल्यांच्या यादीत अभिनेते जितेंद्र यांचेही नाव आले आहे.
नंदुरबारमध्ये प्रचारफेरी निघाली असताना, एका गाडीत जितेंद्र लोकांना अभिवादन करत होते. त्यावेळी जितेंद्र चौधरी या नावाची व्यक्ती गाडीच्या जळ आली आणि त्याने एकामागोमाग एक चप्पल फेकली. ही चप्पल जितेंद्र यांना लागली. चप्पल फेकल्यानंतर जितेंद्र चौधरी याने शिवीगाळही केली. अभिनेते जितेंद्र हे कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी येथे आल्याचा राग आल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. त्यांनी भाजपचा प्रचार करावा अशी त्याची अपेक्षा होती.
नंदुरबारमध्ये यावेळी निवडणुकीत भलतीच चुरस आहे. कॉंग्रेसचे नऊ वेळा खासदार झालेले माणिकराव गावित, भाजपचे डॉ. सुहास नटावदकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित हे निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे माणिकराव गावितांना ही निवडणूक सोपी नाही. त्यातच प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदा सोनिया गांधींची सभा प्रथेप्रमाणे नंदुरबारमध्ये झालेली नाही. त्यामुळे माणिकरावांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणूनच प्रचारासाठी त्यांना यंदा प्रथमच सिनेतार्यांना आणावे लागले आहे. पण त्यातच असा प्रकार घडल्याने कॉंग्रेसजन संतापले आहेत.