लोकसभा निवडणुकीत पार तोंडावर पडलेल्या भाजपला आता नेतृत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे. पंतप्रधानपदाची अडवानींची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर आता त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात लोकसभेत पक्षाचे नेतृत्व कोण करेल हा नवा प्रश्न उभा ठाकला आहे.
वाजपेयीनंतर पूर्णपणे पक्षाची सुत्रे ताब्यात घेणार्या अडवानींनी स्वतःलाच पीएम इन वेटिंग असे या निवडणुकीपूर्वी जाहिर केले होते. पण आता त्यांची इच्छा अपूर्ण झाल्याने त्यांनी निवृत्तीचा मार्ग धरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यांच्यानंतर त्यांची जागा कोणाला द्यावी हा भाजपसमोरचा प्रश्न आहे. पक्षाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी अडवानींनाच या पदावर रहावे असे सुचवले आहे. पण त्याचवेळी पक्षात्या अतृप्तांच्या इच्छाही जागृत झाल्या आहेत. मुरली मनोहर जोशींनी ही जबाबदारी पेलायला आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
अडवानींनी स्वतःहून निवृ्तीचा मार्ग धरून नवा आदर्श उभा केला आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. दुसरीकडे भाजपची मातृसत्ता असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही यात हस्तक्षेप करायला सुरवात केली आहे. भाजपला आपले नेतृत्व, अजेंडा व कार्यप्रणाली यावर पुनर्विचार करायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. निकालानंतर काही प्रमुख संघ नेत्यांनी अडवानींशी चर्चा केल्याचे समजते.
जोशींच्या व्यतिरिक्त खुद्द राजनाथसिंह, जसवंत सिंह व सुषमा स्वराज हेही निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करायला हेही तयार आहेत. पण सध्या तरी अडवानींची समजूत काढली जाईल. ते नाहीच तयार झाले, तर मग वरीलपैकी कुणाची तरी निवड करण्यात येईल.