लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तिसरी आघाडी मजबूत झालेली असेल, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे. निकालानंतर धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येण्याने ही आघाडी मजबूत होईल, हे सांगताना धर्मनिरपेक्ष सरकार स्थापण्यासंदर्भात कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी असेही करता यांनी नमूद केले.
बिगर कॉंग्रेसी धर्मनिरपेक्ष पक्ष तिसर्या आघाडीकडे येतील. त्यावेळी कॉंग्रेसची भूमिका काय असेल? कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष सरकार स्थापण्यात कोणती भूमिका बजावेल? ही भूमिका सकारात्मक असेल की भाजपसारख्या जातीयवादी पक्षांना सहाय्यकारक असेल? ते स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे करात म्हणाले.
गेल्या निवडणुकीत डाव्यांचे साठ खासदार निवडून आले होते. त्यातील ५४ लढतीत डाव्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होताय पण तरीही धर्मनिरपेक्ष सरकार स्थापण्यासाठी आणि जातीयवाद्यांना दूर ठेवण्यासाठी आम्ही कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता, याकडेही करात यांनी लक्ष वेधले.