कॉंग्रेसची आता सरकार बनविण्याची तयारी

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर आता कॉंग्रेसने सरकार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तारूढ संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारबाहेरील धर्मनिरपेक्ष पक्षांनाही आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे.

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व राहूल गांधी यांनी या यशाचे श्रेय जनता जनार्दनाला दिले आहे. त्याचवेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे असतील, असेही सोनियांनी स्पष्ट केले आहे.

बिहारमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात लढलेला लालूंचा राजद व रामविलास पासवानांचा लोकजनशक्ती पक्ष हे याहीवेळा कॉंग्रेसबरोबर असतील काय असे विचारले असता, यांच्यासह जे धर्मनिरपेक्ष पक्ष येण्यास तयार असतील, त्यांना आम्ही बरोबर घेण्यास तयार आहोत, असे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.

भाजप व शिवसेनेशी संबंध नसेल त्या पक्षाला आम्ही धर्मनिरपेक्ष असे मानतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समाजवादी पक्षाने गेल्यावेळी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांचा पाठिंबा घेणार काय असे विचारले असता, आता हे मुलायम यांनी ठरवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही पक्षाला एकटे सोडलेले नाही, असे स्पष्ट करून डावेही आपल्यसाठी अजूनही अस्पृश्य नाही, हे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा