मी लोकसभा निवडणूक लढवणार, अशा बातम्या पसरल्या आहेत. मात्र या निव्वळ अफवा आहेत. मी निवडणूक लढणार नाही किंवा कोणत्याही पक्षासाठी प्रचारही करणार नाही, असे ट्विट सलमानने केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च रोजी ट्विटरवर सलमानला टॅग करून मतदारांना आवाहन करण्याची विनंती केली होती. ते ट्विट आज रीट्विट करत सलमानने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व मतदारांना आवाहन केले होते. आपण लोकशाहीत राहतो. येथे मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. हा हक्क आपण सर्वांनी बजावायला हवा असे मी आवाहन करत आहे, असे सलमानने या ट्विटमध्ये नमूद केले होते. सलमानने हे ट्विट केले आणि त्यानंतर लगेचच सलमान लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार, अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगली. त्यामुळे सलमानला घाईघाईने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. सलमानने दुसरे ट्विट करत आपण निवडणूक लढणार नसल्याचे तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला.
काँग्रेसकडून होती ऑफर?
गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा गड मानला जाणारा मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघ जिंकण्यासाठी काँग्रेस या मतदारसंघातून सलमानला उमेदवारी देणार, अशी चर्चा होती. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी तसे संकेतही दिले होते.