उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका किरीट सोमय्या यांना भोवणार उमेदवारी संकटात

मंगळवार, 19 मार्च 2019 (17:21 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणे भाजप खासदार किरीट सोमय्यायांना भोवणार असे चित्र आहे. ईशान्य मुंबई येथील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत असून, या भागातून किरीट सोमय्यांसह अजून एक नाव द्या अशी शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केलीय, त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीसंदर्भातील अडचणी वाढल्या आहेत.  
 
मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली त्यामुळे शिवसैनिकांमध्ये किरीट सोमय्यांबद्दल संताप  आहे. तर  शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना पाडणारच असा निर्धार व्यक्त  केला आहे. शिवसैनिकांनी थेट भाजप खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. युतीचा उमेदवार जर किरीट सोमय्या असतील तर त्यांना पाडू असा थेट इशारा शिवसेना विभागप्रमुखांनी दिला आहे. 
 
मुंबईत सहापैकी शिवसेनेचे तीन विद्यमान खासदार असून, इतर तीन ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. युतीत दरी निर्माण करणारे भाजप खासदार किरीट सोमय्यांवर शिवसैनिक आजही भयंकर संतप्त आहेत.तर जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा पत्रकार परिषदेतून सोमय्या यांना बाहेर पाठवले होते, तेव्हापासून शिवसेनेने आपला राग दाखवला आहे. जर शिवसैनिकांनी सोमय्या यांना मतदान केले नाही तर याचा फायदा आघाडीला होईल आणि मुंबईतील मुख्य जागा जाईल यामुळे दुसरा उमेदवार भाजपा ठरवण्याच्या तयारीत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती