या दिग्गजांनी केले लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल

बुधवार, 27 मार्च 2019 (08:24 IST)
लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, 11 एप्रिल व 18 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये राज्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे, त्याकरीता अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. महाराष्ट्रासह देशभरात अर्ज भरण्याची उमेदवारांची जोरदार लगबग होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांनी नांदेडमधून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आमदार अमिता चव्हाणही उपस्थित होत्या. नांदेडमधून भाजपने अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक यशपाल भिंगे देखील निवडणूक लढवत आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी अर्ज दाखल केला. शिवसेना-भाजप युतीकडून प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा क्षेत्रातून अर्ज दाखल केला तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना-भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उस्मानाबादमधून अर्ज दाखल केला आहे. सोलापूर मतदार संघातून लोकसभेसाठी महाआघाडीतर्फे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, सेना-भाजप महायुतीतर्फे भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य या तिन्ही प्रबळ दावेदारांचे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीची रंगत वाढली असून सर्व उमेदवार त्यांच्या प्रचावर लक्ष देणार आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावती येथून  उमेदवारी अर्ज भरला. बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.यवतमाळमधून काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला. तसेच, युतीच्या भावना गवळी, प्रहारच्या वैशाली येडे यांनीही अर्ज दाखल केला. भाजप नेते पी. बी. आडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती