महाआघाडीचा जाहीरनामा हा सर्व समाजघटकांचा विचार करून बनवलेला आहे. भाजपाचा जाहीरनामा हा अर्धवट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते निगडी येथे आले होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी यांचा उल्लेख नाही. सरकारच्या याच निर्णयांमुळे देशवासियांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विकासाबाबत बोलत नाहीत, त्यांनी यावेळी प्रचारासाठी भलतेच वैयक्तिक मुद्दे शोधले आहेत. त्यामुळे आता परिवर्तन करणे गरजेचे आहे. आपल्याला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, म्हणून गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. अजित पवार आणि आजोबा शरद पवार हे पार्थ पवार यांच्या निवडणुकीत जास्त रस घेत असून त्यामुळे ही जागा एक आवाहन बनले आहे. राष्ट्रवादी तर्फे पार्थ यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.