जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचे संस्थापक-सीईओ जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांचा घटस्फोट हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरलाय. घटस्फोटाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जेफ यांची (माजी) पत्नी मॅकेन्झी जगातील चौथ्या क्रमांकावरची सर्वात श्रीमंत महिला ठरलीय. बेजोस आणि त्यांच्या पत्नीमध्ये २५ टक्के शेअर्सचा करार झालाय. याद्वारे बेजोस यांनी २.५२ लाख करोडचे शेअर्स पत्नी मॅकेन्झी हिच्याकडे सोपवलेत. त्यानंतर मॅकेन्झी यांच्या नावाची जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला म्हणून नोंद झालीय. करारानुसार, मॅकेन्झी यांनी ७५ टक्के शेअर आणि आपल्याकडील मतदानाचा अधिकारही बेजोस यांना दिलाय.
आपल्या घटस्फोटाबद्दल माहिती देत मॅकेन्झी यांनीही एक ट्विट केलंय. 'मी वॉशिंग्टन पोस्ट, ब्लू ओरिजिन आणि अमेझॉनमधील आपला मतदानाचा अधिकार सोडून खुश आहे. या सर्व अविश्वसनीय कंपन्यांना योग्य पद्धतीनं हाताळण्यासाठी मी जेफला हा अधिकार देत आहे. हे माझ्याकडून जेफला समर्थन असेल. मी माझ्या भविष्यासाठीही उत्साहीत आहे. जेफसोबत माझ्या भूतकाळासाठी मी कृतज्ञ आहे आणि येणाऱ्या भविष्यासाठीही आशादायी आहे' असं मॅकेन्झी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.