न्यूयॉर्क- मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. म्हणजेच या अॅपचे युजर्स जगभरात पसरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे रोज एक अब्ज युजर्स व्हॉट्सअपॅच्या माध्यमातून मित्र व परिवाराच्या संपर्कात असतात, असे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले.
व्हॉट्सअॅपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ज्यावेळी हे अॅप आम्ही वापरात आणले त्यावेळी महिन्याला सुमारे एक अब्ज इतके युजर्स या अॅपचा वापर करत होते. मात्र, सध्या या अॅपला मिळत असेलेला प्रतिसाद पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत. कारण, रोज सुमारे एक अब्ज लोक आमच्या अॅपचा वापर करत आहेत.
व्हॉट्सअॅपकडून काही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार एका महिन्यात किमान एकदा तरी व्हॉट्सअॅपचा वापर करणार्या युजर्सची संख्या 1.3 अब्ज इतकी आहे. भारतातही व्हॉट्सअॅपचे मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये भारतातील सक्रिय युजर्सची संख्या 20 कोटी होती. मात्र, भारतात रोज व्हॉट्सअॅप वापरणार्या युजर्सची संख्या नेमकी किती आहे. याबाबत सांगण्यात आलेले नाही. फेसबूकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपवर रोज 55 अब्ज संदेश आणि 4.5 अब्ज फोटो टाकले जातात. हा अॅप 60 भाषेत कार्यरत असून त्यावर रोज एक अब्ज व्हिडिओ शेअर केले जातात.