पेटीएम फास्टॅग 15 मार्चनंतर बंद होणार, उरलेले पैसे असे काढा

गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (16:43 IST)
काही वर्षांपूर्वी जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे वादात सापडलेली पेटीएम ही कंपनी आता पुन्हा अडचणीत सापडली आहे. तुम्ही पेटीएम वापरत असाल तर मग पेटीएमवरच्या निर्बंधांच्या बातम्या तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही तुमच्या गाडीवर पेटीएमचा फास्टॅग लावला असेल तर आता तो फास्टॅग बंद पडू शकतो. 15 मार्च नंतर त्यात तुम्हाला रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाहीये. मग पेटीएमचा फास्टॅग वापरणाऱ्यांनी आता काय करायचं? आणि आता त्या फास्टॅगमध्ये जे पैसे आहेत त्यांचं काय करायचं? यासह पेटीएम फास्टॅगच्या संदर्भात पडलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.
 
पेटीएम फास्टॅगचं आता काय होणार?
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)च्या नवीन निर्देशांनुसार 15 मार्च 2024नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे फास्टॅग बंद होणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे असे फास्टॅग आहेत त्यांना ते डीअ‍ॅक्टिव्हेट करावे लागतील आणि मग नवीन फास्टॅग खरेदी करावा लागणार आहे. आरबीआयने 29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेत असणारी खाती, पेटीएम वॉलेट आणि फास्टॅगमध्ये पैसे डिपॉझिट करण्यावर बंदी घातली. यानंतरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकृत फास्टॅग पुरवणाऱ्या कंपन्यांच्या यादीतून पेटीएमला वगळलं. आरबीआयने नंतर ही मुदत 15 मार्च 2024 पर्यंत वाढवली. खरं म्हणजे फास्टॅगची सुविधा सुरु झाली तेंव्हा लाखो वाहन मालकांनी पेटीएमच्या फास्टॅगची निवड केली होती. पण आता या सगळ्यांना त्यांचे फास्टॅग 15 मार्चच्या आधी डीअ‍ॅक्टिव्हेट करून घ्यावे लागणार आहेत. सध्या तुम्ही हा फास्टॅग वापरत असाल तर तो लगेच बंद होणार नाही पण 15 मार्चनंतर मात्र त्याचा काहीही उपयोग असणार नाहीये.
 
पेटीएम फास्टॅगवरचे पैसे ट्रान्सफर करता येतील का?
केंद्र सरकारने 'One Vehicle One Fastag' म्हणजेच एका गाडीसाठी एकच फास्टॅग ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे एकच फास्टॅग वेगवेगळ्या गाड्यांसाठी किंवा एकाच गाडीवर वेगवेगळे फास्टॅग वापरता येणार नाहीत.
आधीचा फास्टॅग डीअ‍ॅक्टिव्हेट करूनच नवीन फास्टॅगसाठी केवायसी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करता येणार आहे.
आरबीआयने पेटीएमच्या ग्राहकांसाठी काही FAQ म्हणजेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं प्रकाशित केली आहेत. त्यात त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की पेटीएम फास्टॅगवरील रक्कम दुसऱ्या बँकेच्या फास्टॅगवर ट्रान्सफर करता येणार नाही. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना त्यांचे फास्टॅग निष्क्रिय करूनच पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. पेटीएम फास्टॅगवर तुमचे पैसे असतील तर 15 मार्चच्या आधी तुम्हाला ते खर्च तरी करावे लागतील किंवा पेटीएम पेमेंट्स बँकेकडून रिफंड तरी मागावा लागेल.
 
पेटीएम फास्टॅग बंद कसा करायचा?
तुमच्याकडे जर पेटीएम फास्टॅग असेल पण तुम्ही पेटीएमचं अ‍ॅप वापरत नसाल तर तुम्हाला आधी ते अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागेल. यानंतरची प्रक्रिया सहा टप्प्यांमध्ये करायचीय.
 
1. पेटीएमचं अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या पेटीएम खात्यात लॉग इन करा. आधीपासून तुमचं खात नसेल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून लगेच एक खातं बनवता येऊ शकेल.
 
2. त्यानंतर तिथे असणाऱ्या सर्च बॉक्समध्ये Fastag सर्च करा. त्यानंतर Manage Fastag च्या पर्यायावर क्लिक करा.
 
3. ‘Help & Support’ वर क्लिक करा.
 
4. ‘Need help with on-order related queries?’ हा पर्याय निवडा.
 
5. त्यानंतर ‘Queries related to updating the FASTag profile’ या पर्यायावर क्लिक करा.
 
6. शेवटी ‘I want to close my FASTag’ या पर्यायाची निवड करा. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचं पालन करा. तुमचं फास्टॅग निष्क्रिय होईल.
 
हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे एकदा का फास्टॅग निष्क्रिय म्हणजेच डीअ‍ॅक्टिव्हेट झालं की त्यानंतर तुम्हाला ते वापरता येणार नाही. हा फास्टॅग डीअ‍ॅक्टिव्हेट करण्याआधी त्यात काही बॅलन्स असेल तर त्याचा रिफंड पेटीएम पेमेंट्स बँकेकडून मिळवता येणार आहे. यासाठी पेटीएमच्या अ‍ॅपमधून तुम्ही रिक्वेस्ट करू शकता किंवा 1800-120-4210 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही रिफंड मिळवू शकता.
 
नवीन फास्टॅग कसा काढाल?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच National Highways Authority Of Indiaने एकूण 32 बँकांना अधिकृत फास्टॅग वितरक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे NHAI च्या वेबसाईटवर जाऊन किंवा संबंधित बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग खरेदी करू शकता. बहुतेक राष्ट्रीयीकृत आणि मोठ्या खासगी बँका फास्टॅग देतात. यापैकी तुमच्या सोयीच्या आणि विश्वासाच्या फास्टॅगची निवड तुम्ही करू शकता.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती