आयपीएल स्पर्धेच्या जबरदस्त यशस्वीतेनंतर आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी सन 2011 पासून वर्षातून दोनदा आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे नुकतेच म्हटले आहे. परंतु, वर्षातून दोनदा आयपीएल स्पर्धा आयोजित करणे खूप कठीण असल्याचे मत दिल्ली डेयर डेविल्स संघाचा कर्णधार विरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
वर्षातून दोन वेळा आयपीएल स्पर्धा आयोजित केल्यानंतर केवळ चार महिन्यांचा वेळ काढणे अवघड असल्यामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
जर दोनदा आयपीएल स्पर्धा घेण्यास सुरवात केली तर या स्पर्धेत खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू लवकरचं निवृत्ती घेतील. क्रिकेटप्रेमी अजूनही आयपीएलपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहणे पसंत करतात. विशेष म्हणजे, भारत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील सामने पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांचे कॅलेंडर लक्षात घेऊनच वर्षातून दोनदा आयपीएल आयोजित करण्याचा विचार केला जावा, असे सेहवागने म्हटले आहे.