राजस्थान रॉयल्सने पंजाबच्या गल्लीत शिरून ‘किंग्ज’ ला लोळविण्याचा पराक्रम गाजवला. पंजाबचे १४६ धावांचे आव्हान त्यांनी लिलया पार केले. राजस्थानने विजयी लक्ष्य ६ चेंडू आणि ८ विकेटस् शिल्लक ठेऊन गाठले.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला चांगला प्रारंभ मिळाला नाही. धावांचा रतीब टाकणारा कर्णधार द्रविड अवघ्या ४ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणे व शेन वॉटसनने दुस-या विकेटसाठी ६६ धावांची भर टाकून डाव सावरला. २५ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३१ धावा काढणारा वॉटसन पियूष चावलाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. वॉटसन् पियूष चावलाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. वॉटसन बाद झाल्यानंतर रहाणे व संजू सॅम्सनने ७६ धावांची नाबाद भागीदारी करत लक्ष्य गाठले. रहाणेने एक बाजू लावून धरत ४९ चेंडूत प्रत्येकी तीन चौकार व षटकारासह नाबाद ५९ धावा काढल्या. सॅम्सनने ३३ चेंडूत नाबाद ४७ धावा काढताना ५ चौकार व १ षटकार मारला. राजस्थानच्या ५० धावा ४६ चेंडूत तर १०० धावा ८७ चेंडूत निघाल्या. रहाणेने ४३ चेंडूत अर्धशतक ठोकले. पंजाबसाठी गोनीची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने २ षटकात २२ धावा दिल्या. २३ धावांत ३ बळी घेणारा कुपर सामनावीर ठरला.
किंग्ज पंजाबने राजस्थान रॉयल्सला १४६ धावांचे आव्हान दिले. राजस्थाने टॉस जिंकून पंजाबला फलंदाजी दिली मनदीपसिंग भोपळ्यावर बाद झाल्याने पंजाबला चांगला प्रारंभ मिळाला नाही.
ब-याच दिवसानंतर सामना खेळणा-या कर्णधार गिलख्रिस्टने चांगली फलंदाजी केली. गिली आणि शॉन मार्शने संघाचा डाव सावरताना दुस-या विकेटसाठी शतकी (१०१) भागीदारी केली. ३२ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावा काढणारा गिली कूपरच्या चेंडूवर त्याच्याचकडे झेल देवून परतला. डेव्हीड हसीने पुन्हा एकदा निराशा केली. अवघी एक धाव काढून तो परतला. ३१ धावांची भर पडल्यानंतर शॉन मार्शही परतला. कूपरने त्याचा त्रिफळा उडवला. मार्शने ६४ चेंडूत ६ चौकार व २ षटकारासह सर्वाधिक ७७ धावा काढल्या. पंजाबची मधली फळी साफ कोलमडली. धावांचा पाऊस पाडणारा आणि अनेकवेळा संघाचा तारणहार ठरलेला मिलरही ८ धावांवर बाद झाला. त्याची महत्त्वाची वऊकेतअही कूपरने काढली. गोनी ३ वर बाद झाला.२० षटकांत पंजाबने ६ बाद १४५ अशी मजल मारली. पंजाबच्या ५० धावा ४० चेंडूत, १०० धावा ७७ चेंडूत निघाल्या. मार्शने ४४ चेंडूत अर्धशतक ठोकले, कुपरने सुरेख गोलंदाजी करताना २३ धावांत ३ बळी घेतले.