धोनीच्या वादळाने उडाले सनराइजर्स

WD
महेंद्रसिंह धोनीने केलेल्या ३७ चेंडूंतील ६७ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने सनराईर्जस हैदराबादवर ५ गडी आणि २ चेंडू राखून थरारक विजय मिळवला. आयपीएल कारकिर्दीत दोन हजार धावांचा पल्ला पार करणारा धोनीच या लढतीत सामनावीर ठरला.

चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना धोनीने आशिष रेड्डीच्या दुसर्‍या चेंडूवर षटकार आणि २ सलग चौकार मारताना चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने विजयी लक्ष्य १९.२ षटकांत पूर्ण केले. विजयाचा शिल्पकार ठरणार्‍या धोनीने ३७ चेंडूंतच ७ चौकार, ४ षटकारांसह ६७ आणि माईक हसीने २६ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ४५ धावा केल्या. हैदराबादकडून अमित मिश्राने २६ धावांत ३ गडी बाद केले.

विजयाचा पाठलाग करताना माईक हसी आणि मुरली विजय यांनी ४५ चेंडूंत ६२ धावांची जोरदार सलामी दिली; परंतु हे दोघेही ११ धावांच्या आत परतल्याने चेन्नईची बिनबाद ६५ वरून २ बाद ७६ अशी स्थिती झाली. या दोघांनाही अमित मिश्राने यष्टीरक्षक डी कॉकच्या मदतीने तंबूत धाडले. त्यानंतर धोनीही बाद होता होता वाचला. त्याला डेल स्टेनच्या गोलंदाजीवर फाईनलेगला मिश्राने जीवदान दिले. हे जीवदान हैदराबादला चांगलेच महाग पडले. त्यानंतर समोरून रैना, जडेजा व ब्राव्हो हे तिघेही दिग्गज परतल्यानंतर धोनीने चेन्नई सुपर किंग्जला १९.४ षटकांतच ५ गडी गमावून विजय मिळवून दिला.

वेबदुनिया वर वाचा