आयपीएलच्या महासंग्रामातील महामुकाबला आज रंगणार : पुन्हा मुंबई की नवा विजेता?

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (16:07 IST)
पाचवे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार मुंबई इंडियन्सचा संघ आज (मंगळवारी) आयपीएलच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणार व आत्मविश्वासाने भरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला भिडेल. या सामन्यात मुंबई जेतेपदाचा विजयी पंच मारणार की, दिल्ली आपल्या पहिल्या-वाहिल्या चषकावर आपले नाव कोरणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
 
आयपीएलच्या या महासंग्रामातील महामुकाबल्यात मुंबई जेतेपद कायम राखणार की, आयपीएल स्पर्धेला दिल्लीच्या रूपात नवा विजेता मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. रोमांचक सामन्यांचे 52 दिवस पूर्ण झाल्यानंतर आता या विशेष आयपीएलचा अखेरचा सामना शिल्लक राहिला आहे. ही स्पर्धा यासाठी विशेष की, बरीच आव्हाने व अडथळे येऊनही ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून प्रेक्षकांना कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ झटकण्यास एकप्रकारे मदतच झाली. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माची नजर पाचव्या किताबावर आहे. तर मागील बारा सत्रात अपयशी ठरल्यानंतर अंतिम फेरी गाठण्यात दिल्लीला यश मिळाले आहे. मुंबईने 15 पैकी 10 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 16 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय  प्राप्त केला आहे. 
 
मुंबईच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या सुरुवातीपासून आपला दबदबा कायम राखला आहे. त्यांच्या फलंदाजांनी 130 षटकार मारले आहेत. तर दिल्लीने 84 षटकार खेचले आहेत. क्विंटन डी कॉकची कामगिरी विशेष कौतुक करण्यासारखी आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यांत भारतीय संघात संधी न मिळालेल्या सूर्यकुमार यादवने याचे दुःख न मानता ज्या पध्दतीने फलंदाजी केली आहे, ती पाहिली तर त्याने एक आदर्श नमुना उभारला आहे, असेच भासते. त्याने आतापर्यंत 60 चौकार व 10 षटकार खेचले आहेत. इशान किशनने 29 षटकार मारले आहेत. दिल्लीचे गोलंदाज कगिसो रबाडा (29 बळी), एन्रिच नॉर्त्जे (20 बळी) हे ही लयीत आहेत. तर पांड्या बंधूही आव्हान उभे करू शकतात. दिल्लीकडून शिखर धवनने 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आता त्याला जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्टच्या  अप्रतिम यॉर्कर व इनस्विंग गोलंदाजीचा सामना करण्यासाठी विशेष योजना आखावी लागेल.
 
या सत्रात तीन सामन्यांमध्ये मुंबईने दिल्लीविरुध्द एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. मात्र,सर्वात महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली बाजी मारण्यात यशस्वी झाली तर या तिन्ही पराभवांचे महत्त्व उरणार नाही. दुसर्यान क्वॉलिफायर सामन्यात असे दिसून आले की, दिल्लीने उत्तम संघ निवडला आहे. डावाची सुरुवात मार्कुस स्टोईनिसकडून करण्याचा निर्णय  योग्य  सिध्द झाला.
 
शिमरॉन हेटमायरवर वेगवान फलंदाजीची जबाबदारी आहे. पॉवर प्लेमध्ये आर. अश्विनवर मोठी जबाबदारी असेल. या सामन्यातील विजयाच्या माध्यमातून अय्यर भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी पक्की दावेदारी करू शकतो. रिकी पॉन्टिंग कुशल रणनीतीकारच्या   रूपात आपले महत्त्व अधोरेखित करेल. तर सूर्यकुमार निवड समितीला आपल्या फलंदाजीने उत्तर देण्यास उत्सुक असेल.
सामन्याची वेळ
संध्याकाळी 7.30 वाजता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती