युएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव करत आयपीएलमधील विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला आणि संघाने 22 धावा देऊन तीन गडी गमावले पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या फिफ्टीच्या जोरावर संघाने मुंबई इंडियन्ससमोर 157 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. दिल्लीकडून 157 धावांचे लक्ष्य असताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. संघासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याच्याशिवाय ईशान किशनने 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनिच नॉर्तेने दोन तर कॅगिसो रबाडा आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
यशस्वी खेळाडू आणि कर्णधार
रोहित हा आयपीएलमधील एकमेव यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहित आतापर्यंत एकूण 6 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. रोहित 1 वेळा खेळाडू तर 5 वेळा कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात खेळला आहे. या सहाही वेळा तो यशस्वी झाला आहे. रोहित 2009 मध्ये हैदराबादकडून खेळत होता. तेव्हा अंतिम सामना हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला होता. या अंतिम सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर विजय मिळवला होता.