बोटस्वानामध्ये सापडला जगातील दुसरा सर्वांत मोठा हिरा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (15:07 IST)
बोट्सवाना इथल्या खाणीमधून तब्बल 2492 कॅरट वजनाचा हिरा सापडला असून हा जगातील दुसरा सर्वांत मोठा हिरा आहे.कॅनडाच्या लुकारा डायमंड फर्मच्या मालकीची ही खाण असून या खाणीतून हा हिरा शोधून काढण्यात आला आहे.
1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एका खाणीत 3106 कॅरेट वजनाचा हिरा सापडला होता. त्याचे नऊ तुकडे करून त्यापैकी काही हिऱ्याचे तुकडे हे ब्रिटिश शाही क्राऊनमध्ये लावण्यात आले आहेत.
हा जगातील सर्वांत मोठा हिरा आहे. त्यानंतर आता बोट्सवानाची राजधानी गॅबोरोनपासून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या कारोवे खाणीत हा हिरा सापडला आहे.
दक्षिण अफ्रिकेमध्ये जो हिरा सापडला होता त्यानंतर हा सर्वांत मोठा हिरा असल्याचं बोट्सवाना सरकारनं म्हटलं आहे.
बोट्सवाना हा जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश असून इथं जगातल्या एकूण हिऱ्याच्या उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन एकट्या बोट्सवानामध्ये केलं जातं. याआधीही याआधी 2019 ला देखील 1758 कॅरेट वजनाचा हिरा इथं सापडला होता.
लुकारा फर्मने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे की "हा हिरा आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत मोठ्या हिऱ्यापैकी एक आहे."
"आम्हाला इतका मोठा हिरा सापडला याबद्दल आम्ही आनंद असून लुकाराच्या मेगा डायमंड रिकव्हरी एक्स-रे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा हिरा शोधला," असे लुकाराचे प्रमुख विलियम लॅम्ब म्हणाले.
मौल्यवान हिऱ्याला शोधून त्याचं जतन करण्यासाठी 2017 पासून हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. यामुळे क्रशिंग प्रक्रियेदरम्यान हिरा तुटण्याची शक्यता कमी असते. लुकारा फर्मने अद्याप या हिऱ्याची गुणवत्ता आणि त्याच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही.
पण,युकेमधल्या फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये लुकाराच्या निकटवर्तीयांच्या हवाल्यानं या हिऱ्याच्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे. या हिऱ्याची अंदाजे किमत 40 मिलियन डॉलर पेक्षा जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय.
2019 मध्ये बोत्सवानामध्ये सापडलेल्या 1758 कॅरेट वजनाचा हिरा लुई व्हिटॉनने या फ्रेंच फॅशन ब्रँडने विकत घेतला होता. पण, त्याची किंमत उघड केली नव्हती.
2016 मध्ये याच खाणीत 1109 कॅरेट वजनाचा हिरा सापडला होता. त्यानंतर लंडनमधल्या ग्रॅफ डायमंडचे अध्यक्ष लॉरेन्स ग्रॅफ यांनी 53 मिलियन डॉलर्सला विकत घेतला होता.
या खाणीची पूर्ण शंभर टक्के मालकी लुकारा फर्मकडे आहे. पण, बोट्सवाना सरकारनं एक कायदा पारित केला असून त्याद्वारे कंपन्यांना खाणीचा परवाना मिळाल्यानंतर सरकार भागधारक बनण्यास इच्छुक नसेल तर 24 टक्के हिस्सा हा एखाद्या स्थानिक फर्मला विकावा असं सांगणार असल्याचं रॉयर्टने त्यांच्या वृत्तात म्हटलं होतं.