चीनमधल्या कोव्हिड संकटामुळे मोबाईल आणि गरजेच्या वस्तू महागणार?

सोमवार, 21 मार्च 2022 (13:05 IST)
युद्ध, महागाई आणि त्यात आता पुन्हा चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन लागलंय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून माल इतर देशांमध्ये आणि माझ्यापर्यंत कसा पोहोचेल हे जागतिक पुरवठा साखळीसाठी वास्तविक खूप गुंतागुंतीच आण् वादळासारखं आहे.
 
जेव्हा चीनमध्ये अशी परिस्थीती निर्माण होते तेव्हा त्याचा संपूर्ण जगावर मोठा प्रभाव पडतो कारण जगातील तिसरी सर्वांत मोठी उत्पादन क्षमता चीनमध्येच आहे.
 
तुम्ही ऑनलाइन काहीतरी खरेदी करत असाल तर असं म्हणतात की, ते चीनमधल्या शेन्चेनमध्ये बनलं असण्याची शक्यता जास्त असते .
 
चीनच्या दक्षिण पूर्व भागात असलेल्या या शेन्चेन शहराची लोकसंख्या जवळपास 1.75 कोटी इतकी आहे, जिथं चीनचे जवळपास निम्मे ऑनलाइन रिटेल निर्यातदार राहतात.
या कारणास्तव, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असतांना रविवारी शेन्चेनमध्ये सहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील व्यवसायांना खूप मोठा फटका बसलाय.
 
आणि शांघाय, जिलिन आणि ग्वांगझूसारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि प्रांतांमध्येही कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
 
बंदरांवर जहाजांची गर्दी वाढली
जगातील मालवाहू जहाजांवर नजर ठेवणाऱ्या प्रोजेक्ट 44 नुसार चीनच्या अनेक बंदरांमध्ये जहाजांची संख्या आधीच वाढू लागली आहे.
 
"आम्ही यांटियन पोर्टवर उभ्या असलेल्या जहाजांमध्ये 28.5% वाढ पाहिली आहे, जे युरोप आणि उत्तर अमेरिकेत मालाची निर्यात करणारं सर्वांत मोठं बंदर आहे," असं प्रोजेक्ट 44 चे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅडम कॉम्पन म्हणाले.
हे तेच बंदर आहे जे गेल्या वर्षी कोव्हिडमुळे बंद झालं होतं आणि त्यामुळे ख्रिसमसच्या काळात माल पोहोचण्यास विलंब झाला होता.
 
कोरोना प्रतिबंध त्यावेळेस लावले गेले होते जेंव्हा फेब्रुवारीमध्ये चिनी नववर्षाच्या सुट्ट्यांनंतर जेव्हा चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुट येऊ लागलं होतं.
 
चीनचे नवीन कोव्हिड निर्बंध बरेच कठोर आहेत परंतु असं म्हटलं जातंय की ते जास्त काळ टिकणार नाहीत.
 
कंपन्यांची तयारी काय आहे?
ब्रिटीश चेंबर ऑफ कॉमर्स चायनाचे व्यवस्थापकीय संचालक स्टीफन लिंच म्हणतात, "ही दुधारी तलवार आहे."
 
"चीनने हे त्वरीत केलं ज्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत परंतु त्या तुलनेत परिस्थिती लवकरच सामान्य होईल असं दिसतंय."
असं दिसत आहे की याक्षणी कंपन्या खूप चांगल्या प्रकारे याचा सामना करण्यास तयार आहेत.
 
लिंच स्पष्ट करतात, "आम्ही असे लॉकडाउन पाहिले आहेत, त्यामुळे कंपन्यांनी मजबूत पुरवठा साखळी व्यवस्थापन तयार केलं आहे."
 
उदाहरणार्थ, अॅमेझॉन या सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स कंपनीनं ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये वाढ होत असतांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून चीनमध्ये भरपूर इन्व्हेंटरी खरेदी केली आहे. अलीकडच्या निर्बंधांमुळे त्यासाठी फार मोठी समस्या निर्माण होईल असं वाटत नाही.
 
अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने बीबीसीशी बोलतांना सांगितलं की, "आम्ही या निर्बंधांचं पालन करून आमचा तयार माल या प्रदेशातील शेजारच्या गोदामांमध्ये हलविण्यास सक्षम आहोत."
 
दुसरं उदाहरण म्हणजे Apple चे iPhones बनवणाऱ्या फॉक्सकॉनचं. त्यांनी त्यांचं उत्पादन इतर दुसऱ्या ठिकाणीर हालवलं आहे आणि त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना बबल सिस्टममध्ये काम करण्यास सांगितलं आहे. यामध्ये लोक त्यांच्या कॅम्पसमध्ये राहतील आणि काम करतील.
 
"फॉक्सकॉनसाठी हे सोपं असू शकतं," हँग सेंग बँक चायनाचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ डॅन वांग म्हणतात.
 
"परंतु इतर उत्पादक जे बहुतेक याच प्रदेशात आहेत आणि जहाज वाहतुकीवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हे खूप कठीण होऊ शकतं कारण चीनमधील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे."
 
चीनचं सध्याचं धोरण
चीनमधील ही नवीन परिस्थिती त्यांच्या शून्य कोव्हिड धोरणामुळे निर्माण झाली आहे.
 
गुरुवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील सर्वोच्च नेत्यांसोबतच्या बैठकीत देश हे धोरण टिकवून ठेवेल असं सांगीतलं. महामारीच्या निर्बंधांमुळे आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत यावरही त्यांनी भर दिला.
यामुळे मोठा खर्च होत आहे परिणामी काही मोठ्या कंपन्या चिनी बाजारपेठेत त्यांच्या उपस्थितीचा पुनर्विचार करत आहेत.
 
सिंगापूरची सर्वांत मोठी मालवाहतूक कंपनी हाऊलियोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्विन इया म्हणतात की त्यांचा उद्योग आता अधिक लवचिक झाला आहे आणि ते चीनशिवाय इतर पर्याय शोधत आहेत.
 
"अनेक प्रमुख स्पर्धकांनी त्यांची साधनसंपत्ती आणि योजनांमध्ये विविधता आणली आहे आणि ते त्यांचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी ठेवत नाहीत," असं ते म्हणतात.
"दक्षिण पुर्वेच्या दृष्टीकोनातून, व्हिएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशियामधील कारखान्यांतील ऑर्डरमध्ये वाढ झाल्यामुळे आम्ही संभाव्यपणे अशा गोष्टी घडताना पाहू शकतो."
 
झेनेटाचे मुख्य विश्लेषक पीटर सँड या गोष्टीला सहमती दर्शवतात.
 
"त्यांच्या आणीबाणीच्या योजनांचा एक भाग म्हणून, कंपनीनं उत्पादनात वाढ केली आहे. त्यांच्या इन्व्हेंटरीतून शेजारच्या देशांमध्ये ही वाढ केलीय. जेणेकरून जिथं ग्राहकांची जास्त मागणी आहे तिथं ग्राहकांसाठी उत्पादन थांबवलं जाऊ नये कारण हा सर्वांत महाग पर्याय असू शकतो," असं ते म्हणतात.
चीनमधील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे मायकेल हार्ट यांनी म्हटलं आहे की त्यांचे बरेच सदस्य जिथून येतात तिथं त्यांचं काम स्थलांतरित करण्याचा विचार करत आहेत परंतु त्यांची संख्या अजूनही कमी आहे.
 
"परंतु गेल्या वर्षी त्यांचं काम इतरत्र हलवू पाहणाऱ्या लोकांची संख्या 22% होती आणि त्यांनी कोव्हिड निर्बंधांचा उल्लेख केला जो मागील वर्षाच्या तुलनेत 5% जास्त होता."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती