परवेझ मुशर्रफ यांना नेमका काय आजार झालाय?

मंगळवार, 14 जून 2022 (22:24 IST)
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूबद्दल काही दिवसांपूर्वी अफवा पसरली होती. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढून ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुशर्रफ यांना नेमकं काय झालंय याचीही माहिती दिली. मुशर्रफ यांना बरा न होण्यासारखा एक दुर्धर आजार झालाय अ‍ॅमीलॉयडॉसिस.
 
हा आजार अमेरिकेतही दोन लाख लोकांमागे एखाद्यालाच होतो.असा हा दुर्मीळ आजार नेमका काय आहे आणि परवेझ मुशर्रफ सध्या कसे आणि कुठे आहेत जाणून घेऊया.
 
परवेझ मुशर्रफ यांना काय झालंय?
शुक्रवारी 10 जूनला परवेझ मुशर्रफ यांच्याच ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या कुटुंबींयांचा एक संदेश झळकला. यात म्हटलं होतं,
 
"ते व्हेंटिलेटरवर नाहीत. पण, त्यांना झालेल्या आजाराच्या (अ‍ॅमीलॉयडॉसिस) जटिलतेमुळे मागचे तीन आठवडे ते रुग्णालयात आहेत. ते कठीण प्रसंगातून जात आहेत. कारण, इथून तब्येतीला उतार पडणं शक्य नाही. अधिकाधिक अवयव निकामी होत आहेत. निदान त्यांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी प्रार्थना करा."
 
त्यानंतर मुशर्रफ यांना झालेला अ‍ॅमीलॉयडॉसिस हा आजार काय आहे आणि त्यावर उपाय आहेत का यावरही चर्चा सुरू झाली. या आजारात शरीरारत अतिरिक्त पॉलिमर प्रोटीन म्हणजे प्रथिनं साठतात. आणि त्याचा परिणाम पेशींवर होऊन जिथे ही प्रथिनं साठतात ते अवयव निकामी व्हायला लागतात.
 
एरवी जर अशी प्रथिनं जिवंत असतील तर त्यामुळे उलट शरीराचा फायदाच होत असतो. म्हणजे ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्तीही वाढते. तसंच हार्मोन्स स्त्रवतानाही त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही प्रथिनं करतात.
 
पण, ही प्रथिनं मृत असतील आणि प्रमाणाबाहेर वाढली तर मात्र पेशींवर ताण पडून अवयवांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
 
अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण संस्थेनं या रोगाला दुर्मीळ रोगाचा दर्जा दिला आहे. कारण, तिथंही दोन लाखांमध्ये एखाद्यालाच हा आजार होतो. मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या हेमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण पडते सांगतात...
 
"अ‍ॅमीलॉयडॉसिस हा मूत्रपिंड आणि बोनमॅरो यांना होणारा दुर्मीळ आजार आहे. याचं निदान खूप कमी वेळा होतं. कारण, आजार लवकर लक्षात न आल्यामुळे रुग्ण खूप उशिरा डॉक्टरांकडे येतात."
 
त्याच्या पुढे जाऊन डॉ. पडते यांनी अ‍ॅमीलॉयडॉसिस रोगाची कारणंही स्पष्ट केली. "हाडातील पेशी खराब झाल्यामुळे त्या खराब प्रथिनं तयार करतात. आणि अशी प्रथिनं रक्तावाटे शरीरभर पसरून ती वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अ‍ॅमीलॉयडॉसिस हा आजार होतो. यामुळे रक्तशुद्धीकरण न झाल्याने मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. तसंच शरीरात अशुद्धी पसरल्यामुळे हृदयावरही ताण येऊ शकतो. आजाराची गंभीरता वाढली तर रुग्ण वाचण्याची शक्यताही कमी होते." हा महत्त्वाचा धोका डॉ. पडते यांनी सांगितला.
 
उशिरा निदान झालेले रुग्ण वाचण्याची शक्यता कमी असते. तरी वेळेवर उपचार सुरू झाले तर आयुष्य आणि दिनचर्या चांगली घालवता येईल इतकी रुग्णाची तब्येत बरी करता येते.
 
"अलीकडे नवीन उपचार पद्धतीमध्ये प्रथिनं तयार होण्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. किंवा अशी प्रथिनं शरीरात पसरण्याचं प्रमाणही नियंत्रित करू शकतो. किंवा बोनमॅरो ट्रान्सप्लांटचा पर्यायही काही रुग्णांसाठी उपयुक्त आहे. अशा प्रयत्नांमुळे रुग्णाचं आयुष्य 5 ते 10 वर्षांसाठी आपण सुकर करू शकतो. मूत्रपिंड निकामी झालं असेल तर डायलिसिसमुळे रुग्णाला आराम पडू शकतो," डॉ. पडते यांनी अ‍ॅमीलॉयडॉसिस वरील उपचार समजावून सांगितले.
 
परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षही. सध्या ते दुबईत अज्ञातवासात आहेत. पण, त्यांना पाकिस्तानमध्ये परतण्याची अतीव इच्छा होती आणि आहे. पण राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना पाकिस्तान सोडून दुबईत आश्रय का घ्यावा लागला?
 
परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तान का सोडलं?
पाकिस्तानच्या राजकारणात मुशर्रफ पहिल्यांदा प्रकाशझोतात आले जेव्हा नवाझ शरीफ यांनी 1998 मध्ये त्यांना चार स्टार बहाल करून लष्करप्रमुख नेमलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी भारताविरोधात कारगीलच्या युद्धात पाक सैन्याचं नेतृत्व केलं. पण, कारगीलच्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग नव्हता, असं भासवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर फसला.
 
तिथून आणि इतरही कारणांवरून शरीफ आणि मुशर्रफ यांच्यात बेबनाव वाढत गेला. आणि शरीफ यांनी पुढच्याच वर्षी 1999 मध्ये मुशर्रफ यांना लष्करप्रमुख पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला. मुशर्रफ यांनी शरीफ यांच्याविरुद्ध बंड करून सत्ता हस्तगत केली. 2001 मध्ये ते देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाले. आणि त्यांनी नवाझ शरीफ यांना त्यांच्याच घरात नजरकैद केलं.
 
 
मुशर्रफ यांनी पाकिस्तानची घटना बरखास्त केली. आणि देशात आणीबाणी जाहीर केली. पंतप्रधान शौकत अझिझ यांच्याबरोबर त्यांचा अंमल सुरू झाला. देशातल्या मध्यमवर्गाला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जीडीपी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रीय बचत कमी कमी होत गेली. परिणामी देशात आर्थिक विषमता कमालीची वाढली.
 
त्यामुळे मुशर्रफ आणि पंतप्रधान शौकत अझिझ यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये रोष वाढत होता. आणि 2008 मध्ये अझिझ यांनी पंतप्रधानपद सोडल्यावर मुशर्रफ यांची बाजू वेगाने कमकुवत होत गेली. महाभियोगाच्या भीतीने त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं आणि ते लंडनला निघून गेले. त्यांनी पाकिस्तान पहिल्यांदा सोडलं ते असं...
 
मुशर्रफ सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय होते. आणि मुलाखतींमधूनही पाकिस्तानशी आपण कसे जोडले गेलेलो आहोत हे ते नेहमी सांगायचे. म्हणजे पाकिस्तानमधल्या राजकारणात त्यांना कायम रस होता.
 
त्या महत्त्वाकांक्षेपोटीच 2013 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी ते परत पाकिस्तानला आले. पण, यावेळी चक्र फिरली होती. तिथल्या हायकोर्टाने त्यांच्याविरोधात बेनझीर भुट्टो आणि नवाब अकबर बुगटी यांच्या हत्येच्या आरोपावरून अटक वॉरंट काढलं.
 
आणि मग नवाझ शरीफ सत्तेत आल्यावर तर त्यांनी देशाशी गद्दारी केल्याचाच खटला मुशर्रफ यांच्या विरोधात चालवला. यानंतर संधी साधून मुशर्रफ दुबईला पळून गेले. पाकिस्तानातून पळ काढण्याचा हा दुसरा प्रसंग होता...
 
पाकिस्तानात दोन्ही गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले. आणि देशाशी केलेल्या गद्दारीसाठी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पुढे ते देशात हजर नसल्याने लाहौर कोर्टाने त्यांची फाशी रद्द केली. मुशर्रफ दुबईतच राहिले. पण, ट्विटर आणि सोशल मीडियावर कायम आपल्याला पाकिस्तानमध्ये परत यायचं असल्याची त्यांची विधानं गाजत राहिली.
 
कधी त्यात विरोधकांसाठी धमकी असायची तर कधी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा. आताही आजारी पडेपर्यंत ते पाकिस्तानमध्ये परतण्याच्याच गोष्टी करत होते. पण आता मात्र तब्येत पाहता ते कठीण दिसतंय. अ‍ॅमीलॉयडॉसिस आजाराने त्यांचं शरीर जर्जर झालंय.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती