प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही निदर्शक संसदेच्या आवारात घुसले, त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर गोळ्यांचा वापर करावा लागला. सरकारने बुटवल, भैरहवा आणि पोखरा यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सुरक्षा दलांनी सीमेवर पाळत कडक केली आहे.
नेपाळ पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर काठमांडूच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक माध्यमांनुसार, हिंसाचारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, पोलिसांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केलेली नाही. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे.
संसद भवनाच्या आसपासच्या भागात गोंधळ होऊ नये म्हणून काठमांडू जिल्हा प्रशासनाने दुपारी 12:30 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. मुख्य जिल्हा अधिकारी छबी लाल रिजाल यांनी एका सूचनेमध्ये म्हटले आहे की, "प्रतिबंधित क्षेत्रात लोकांची हालचाल, निदर्शने, बैठका, मेळावे किंवा धरणे यांना परवानगी दिली जाणार नाही."नेपाळ सरकारने 4 सप्टेंबर रोजी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि एक्ससह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती.सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.