पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दहशत निर्माण केली आहे. बंदूकधाऱ्यांनी बंदुकीच्या धाकावर दोन बँक कर्मचारी आणि एका चालकाचे अपहरण केले आहे. पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बंदूकधाऱ्यांनी उत्तर वझिरिस्तान आदिवासी जिल्ह्यातील हुरमुज भागातून एका प्रवासी कोचमधून एका बँक व्यवस्थापक, एका कर्मचारी आणि चालकाला जबरदस्तीने काढून अज्ञात ठिकाणी नेले. गुरुवारी बँक कर्मचारी मीरान शाहहून बन्नूला परतत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपहरणाच्या घटनेनंतर, स्थानिक पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने किंवा संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. उत्तर वझिरिस्तान जिल्हा पोलिस अधिकारी वकार अहमद यांनी सांगितले की, अपहरण झालेल्या बँक कर्मचाऱ्यांचा आणि ड्रायव्हरचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
खैबर पख्तूनख्वा येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी फ्रंटियर कॉर्प्सच्या वाहनावर हल्ला केला. या गोळीबारात एक सुरक्षा कर्मचारी ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला उत्तर वझिरीस्तानला लागून असलेल्या बन्नू जिल्ह्यात झाला. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी संपूर्ण नियोजनाने फ्रंटियर कॉर्प्सच्या वाहनावर हल्ला केला.