ट्विटर एलॉन मस्क यांनी खेरदी केलं, पराग अगरवालांची नोकरी गेली
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (09:04 IST)
वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सला ट्विटर विकत घेतलं आहे. या वृत्तानंतर ट्विटरचे मुख्य अधिकारी आणि वित्तीय अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांची नोकरी सोडली आहे.
एलॉन मस्क यांनी आधी ट्विटरला विकत घेण्याची ऑफर दिली होती, पण नंतर ती मागे घेतली. त्यानंतर ट्विटरनं कायदेशीर कारवाई करत मस्क यांना ट्विटर विकत घेण्यास भाग पाडलं आहे. आता हा व्यवहार पूर्ण झाल्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.
पैसै कमावण्यासाठी ट्विटर विकत घेत नसल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरचे मुख्य अधिकारी पराग अगरवाल आणि मुख्य वित्त अधिकारी नेद सेगल आता कंपनीमध्ये कार्यरत नसतील.
ट्विटरचे सहसंस्थापक बिझ स्टोन यांनी एक ट्वीट करत ट्विटरच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. पराग अगरवाल, नेद सेगल आणि विजय गड्डे यांना टॅग करत स्टोन यांनी आभार मानले आहेत. ट्विटरसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार, असं त्यांनी लिहिलं आहे.
त्याच बरोबर न्यूयॉर्क स्टॉक एक्सजेंचनं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून ट्विटरचा शेअर्सची खरेदी-विक्री थांबवण्यात आली आहे.
एलॉन मस्क यांनी त्यांचं ट्विटर बायो बदलून त्यात 'ट्विट चिफ' असं लिहिलं आहे.
तसंच ट्विटरच्या सॅनफ्रान्सिस्कोमधल्या मुख्यालयात ते स्वतः एक वॉश बेसिन घेऊन जात असल्याचा व्हीडिओ त्यांनी ट्वीट केला आहे. त्यावर त्यांनी 'चला ते वाहून जाऊ द्या' असं कॅप्शन लिहिलं आहे.
अनेक जाणकारांच्या मते मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम खूप जास्त आहे. ट्विटरची ग्रोथ त्या तुलनेत नसल्याचं त्यांना वाटतं.
असा घडला सर्व घटनाक्रम
लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मस्क यांनी आधी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली होती. पण जानेवारी 2022 पासून त्यांनी सतत ट्विटरच्या शेअर्सची खरेदी सुरू केली. मार्च उजाडेपर्यंत त्यांच्याकडे ट्विटरचे 5 टक्के शेअर्स जमा झाले होते.
एप्रिलमध्ये त्यांनी ते ट्विटरमधले सर्वात मोठे भागधारक असल्याचं जाहीर करून टाकलं आणि 44 अब्ज डॉलर्सला कंपनी विकत घेण्याची ऑफरही देऊन टाकली.
ट्विटरवरील खोटी खाती बंद करण्याचा त्यांचा इरादा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच हे प्लॅटफॉर्म लोकांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यासाठी जपायचं असल्याचं त्यांनी तेव्हा म्हटलं होतं.
पण मे महिना उजाडेपर्यंत मात्र मस्क यांचं ट्विटर खरेदीबाबत मन बदललं. तसंच ट्विटरवर ट्विटर स्वतः सांगत असल्यापेक्षा जास्त खोटी खाती असल्याचा दावा त्यांनी केला.
जुलैमध्ये त्यांनी त्यांचा ट्विटर खरेदी करण्याचा इरादा नसल्याचं जाहीर करून टाकलं. तर कायद्यानुसार आता मस्क यांना ट्विटर खरेदी करावं लागले, असा दावा कंपनीने केला.
शेवटी ट्विटरने मस्क यांच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टातला खटला थांबवण्याची अट घालत ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी त्यांची ऑफर पुन्हा तपासून पाहिली.