या 'गोंडस' कुत्र्यानं खाल्ले 4 हजार डॉलर्स, मालकानं लावला डोक्याला हात

शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (14:31 IST)
कल्पना करा... तुमच्या घरातल्या पाळीव कुत्र्यानं तुमच्याच घरातल्या 3 लाख 33 हजार रुपयांच्या नोटा चघळून खाल्ल्या तर? तुम्ही नक्की कसे व्यक्त व्हाल? असं कधीच होणार नाही असं तुम्हाला वाटेल. पण अशीच एक घटना अमेरिकेतल्या पेनसिल्व्हानिया राज्यात घडली आहे.
 
इथं सेसिल या गोल्डन डूडल जातीच्या कुत्र्यानं त्याच्या मालकानं एका कंत्राटदाराला देण्यासाठी म्हणून ठेवलेले 4 हजार डॉलर्स म्हणजे आपल्याकडे 3,33,000 रुपये होतील एवढ्या नोटा चघळून खाल्ल्या आहेत.
 
क्लेटन आणि कॅरी लॉ या दाम्पत्यानं हा कुत्रा पाळला आहे. सेसिलनं नोटा चघळून खाल्ल्यावर नोटांचा बहुतांश चोथा त्याच्या विष्ठेत आणि उलटीत मिळाला आहे. मात्र तरीही 450 डॉलरचा भाग अजून सापडलेला नाही असं क्लेटम-कॅरीचं मत आहे.
 
आता एवढे ‘पैसे खाल्ल्यावर’ सेसिल अस्वस्थ होणारच. पण त्याची तब्येत सुधारेल असं त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
 
हे सगळं घडलंय नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यात. क्लेटन यांनी आपल्या पेनसिल्व्हानिया राज्यातल्या पिटर्सबर्ग मधल्या घराला कुंपण घालायचं ठरवलेलं. त्यासाठी कंत्राटदाराचे 4000 डॉलर्स एका पाकिटात घालून स्वयंपाकघरातल्या ओट्यावर ठेवले होते.
 
साधारणतः 30 मिनिटांनी त्यांनी एक दृश्य पाहिले आणि क्लेटन किंचाळलेच. त्यांचा कुत्रा सेसिल त्या पाकिटातले पैसे चघळत होता... सगळीकडे नोटांचे बारीक तुकडे पडले होते. सेसिल त्याच्या आयुष्यातलं सर्वात महागडं जेवण घेत होता पण इकडे क्लेटनच्या काळजाचा ठोका चुकत होता.
 
‘सेसिलनं 4000 डॉलर्स खाल्ले'..., असं क्लेटन जोरात किंचाळले.“त्या क्षणाला हे शब्द माझ्या कानावर पडलेच नाहीत असा विचार मी करू लागले. हे मी ऐकूच शकत नाही असं मला वाटत होतं, मला जणू हार्ट अटॅकच येतो का काय असं वाटलं”, असं कॅरी यांनी स्थानिक पिटर्सबर्ग सिटी वर्तमानपत्राला सांगितलं.
 
वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना या दाम्पत्यानं सेसिलचं वर्णन 'गुफी डॉग' म्हणजे 'धांदरट कुत्रा' असं केलंय.
 
ते गंमतीत म्हणतात, एरव्ही तो खाण्या-पिण्याच्या बाबतीत एकदम 'चोखंदळ' आहे. तो तेवढा खाण्याच्या बाबतीत बुभुक्षित नसल्यामुळे टेबलावर मांस ठेवलं तरी त्याकडे 'हुंगुनही' पाहात नाही. पण आता तो खाण्यासाठी नाही तर, 'पैशाचा भुकेला' होता हे समजलंय.
 
बरं एवढे पैसे खाल्ले म्हणजे काहीतरी त्रास होईल असं वाटलं होतं. पण सेसिल साहेबांनी पैसे खाल्ले आणि स्वारी थेट वामकुक्षीच्या तयारीला लागली. पण लॉ दाम्पत्याचे धाबे दणाणले होते. त्यांनी लगेच त्याच्या डॉक्टरांना फोन केला.
 
पण सेसिल तसा एक पूर्ण वाढ झालेला कुत्रा आहे. त्यामुळे त्याला उपचारांची गरज नव्हती. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगण्यात आलं.
 
मग हे दोघे लागले नोटांचे तुकडे जुळवायला. सेसिलला कधी उबळ येतेय आणि तो तुकडे बाहेर काढतोय याची ते वाट पाहात बसले. काही तुकडे त्यांनी धुवूनही टाकले.
 
स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना कॅरी सांगते, 'हे पाहा माझं सिंक. इथं एकदम घाण वास येतोय.'
 
मग या दोघांनी 50 आणि 100 डॉलर्सचे तुकडे जुळवायचा प्रयत्न केला. नोटांवर दोन्ही बाजूंना असलेल्या नंबर्सची खात्री करुन ते हे काम करत होते. यामुळे बँक या नोटा घेऊन नव्या नोटा देईल असं त्यांना वाटलं.
 
बँकेने त्यातील बहुतांश नोटा घेतल्या. मात्र 450 डॉलर्स अजूनही मिळालेले नाही.
 
लॉ दाम्पत्य म्हणतं, 'अशा गोष्टी होत राहातात.'
 
2022मध्ये न्यूजवीकनेही अशीच बातमी प्रसिद्ध केली होती. तेव्हा फ्लोरिडात राहाणाऱ्या एका बाईच्या लॅब्रेडॉर कुत्र्यानं 2000 डॉलर्स खाल्ले होते. त्याचा व्हीडिओही आला होता. त्यामुळे तो कुत्रा इंटरनेटवर प्रसिद्ध झाला होता आणि त्याचे मालकही अश्रू ढाळताना त्यात दिसले होते.
 
लॉ दाम्पत्यानं मात्र हे हलक्यात घ्यायचं ठरवलं आहे आणि त्यांच्या व्हायरल व्हीडिओमध्ये म्हटलंय की, ‘उरलेले डॉलर्स म्हणजे आमची एक महागडी कलाकृतीच असेल.’
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती