न्यूझीलंडच्या खासदार ज्युली अॅन जेंटर या जबरदस्त चर्चेचा विषय राहिल्या आहेत. ज्युलीने तिच्या फेसबुकवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सायकलने रुग्णालयात जाते आणि तिथे ती एका सुदृढ बाळाला जन्म देते. फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. ही छायाचित्रे पाहताच लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी खासदाराचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
न्यूझीलंडच्या खासदार ज्युली अॅन जेंटर यांना रात्री दोन वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर त्यांनी सायकल चालवून थेट रुग्णालय गाठले. सुमारे तासाभरानंतर त्यांनी एका निरोगी मुलाला जन्म दिला. याची माहिती खासदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिली. सायकल चालवण्यापासून ते मुलाच्या जन्मापर्यंतचे अनेक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये त्यांचा नवराही त्यांच्या सोबत दिसत आहे.
खासदार ज्युली अॅन जेंटर यांनी लिहिले की, आज पहाटे 3 वाजता आमच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यात आले. सायकलवर माझ्या प्रसूती वेदनांचा मी कधीच विचार केला नव्हता, पण तसे झाले आहे. जेव्हा आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो तेव्हा फारशी अडचण नव्हती पण रुग्णालयचे अंतर गाठण्यासाठी आम्हाला दहा मिनिटे लागली आणि आता आमच्याकडे एक गोंडस निरोगी बाळ त्याच्या वडिलांच्या मांडीवर झोपलेले आहे.
त्यांनी रुग्णालयाच्या टीमचे आभार मानले आणि लिहिले की रुग्णालयात पोहोचल्यानंतर एक उत्कृष्ट टीम सापडली, ज्यामुळे प्रसूती लवकर होऊ शकली. खासदार ज्युली अॅन जेंटरची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्युलीच्या या पोस्टवर लोकांच्या जबरदस्त कमेंट्स येत आहेत.