गिर्यारोहक तब्बल 2 हजार फूटांवरून पडूनही सुखरूप, फक्त ‘या’ कारणाने वाचला

सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (20:32 IST)
‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती,’ असं मृत्यूच्या तोंडातून चमत्कारिकरित्या वाचणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत अनेकदा म्हटलं जातं.
 
न्यूझीलंडमधील एका गिर्यारोहकाच्या बाबतीत ही उक्ती खरी ठरली आहे. 2 हजार फूटांवरून पडून येथील एक गिर्यारोहक आश्चर्यकारकरित्या वाचला आहे. त्याला केवळ काही किरकोळ स्वरुपात खरचटलेलं असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
या प्रकारानंतर, बचावलेल्या गिर्यारोहकाबाबत सर्वच ट्रेकिंग ग्रुप आणि पर्वतप्रेमींमध्ये चर्चा सुरू असल्याचं दिसून येतं.
 
या गिर्यारोहकाचं नाव पोलिसांनी अद्याप जाहीर केलं नाही, पण तो 'अतिशय चमत्कारिकरित्या वाचला,' अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
 
न्यूझीलंडमधील नॉर्थ आयलँड परिसरात ही घटना शनिवारी (9 सप्टेंबर) घडली. येथील माऊंट तारानाकी या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी हा गिर्यारोहक गेला होता. यादरम्यान तोल जाऊन गिर्यारोहक तब्बल 600 मीटर (सुमारे 2 हजार फूट) उंचावरून खाली कोसळला.
मात्र, पावसाळी वातावरणामुळे खालील बर्फ हा अतिशय मऊ झालेला होता. त्यामुळे गिर्यारोहक अलगद या बर्फावर पडला.
 
गिर्यारोहक जितक्या उंचावरून पडला त्याची तुलना करायची झाल्यास ही उंची सौदी अरेबियातील मक्का क्लॉक रॉयल टॉवर इतकी आहे. या इमारतीला जगातील सर्वांत उंच इमारतींपैकी एक मानलं जातं. या इमारतीत एकूण 120 मजले आहेत.
 
किंवा लंडनमधील शार्ड इमारतीच्या दुप्पट उंचावरून हा व्यक्ती पडला असंही म्हणता येईल. लंडनमधील शार्ड इमारत ही 73 मजल्यांची असून 309 मीटर उंच आहे.
 
बचावलेला गिर्यारोहक हा येथील गिर्यारोहक ग्रुपचा सदस्य होता. शनिवारी दुपारी माऊंट तारानाकी येथे त्यांचं गिर्यारोहण सुरू असताना तो खाली कोसळला.
 
आपला सहकारी खाली कोसळल्याचं दिसल्यानंतर सर्व गिर्यारोहक घाबरले आणि त्यांनी खाली येऊन त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. ग्रुपने या घटनेची माहिती पोलिसांनाही दिली.
 
यानंतर तारानाकी पर्वतावरील बचावकर्मींचं पथक पडलेल्या गिर्यारोहकाच्या शोधासाठी पाठवण्यात आलं. पण खाली शोध घेतल्यानंतर संबंधित गिर्यारोहक सुखरूप असल्याचं सर्वांना समजलं. यानंतर मात्र गिर्यारोहकांचा जीव भांड्यात पडला.
 
फक्त येथील मऊ बर्फ हे एकमेव कारण गिर्यारोहक वाचण्यासाठी पुरेसं ठरलं, असं पोलिसांनी सांगितलं.
 
न्यूझीलंडमधील माऊंट तारानाकी हा पर्वत गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. माऊंट तारानाकीची चढाई अतिशय आव्हानात्मक असून देशातील सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो.
 
शनिवारच्या घटनेत गिर्यारोहक ज्या ठिकाणाहून खाली कोसळला, त्याच ठिकाणाहून 2021 साली दोन गिर्यारोहक खाली पडले होते. पण दुर्दैवाने त्या दोन्ही गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागला होता.
 
माऊंट तारानाकी हा एक मृतावस्थेतील ज्वालामुखी आहे. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलँडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर हा परिसर आहे.
 
येथील माऊंटन सेफ्टी काऊन्सिलने माऊंट तारानाकीची माहिती देताना येथील आव्हानांबाबत विश्लेषण केलेलं आहे.
 
परिसरातील इतर पर्वतांपासून लांब अंतर, समुद्रकिनाऱ्याची जवळीकता अशा भौगोलिक परिस्थितीमुळे माऊंट तारानाकीवरील वातावरण सातत्याने बदलत असतं. न्यूझीलंडमधील वातावरण हे अतिशय प्रतिकूल मानलं जातं. त्या परिस्थितीत माऊंट तारानाकीवरची परिस्थिती आणखीनच आव्हानात्मक बनते, असं ते म्हणतात.
 
काऊन्सिलच्या मते, “येथील वातावरण आणि मिश्र-खडकाळ जमिनीमुळे माऊंट तारानाकीवरचं गिर्यारोहण अतिशय कठीण आहे. येथे तुमची एक चूकसुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकते.”
 




















Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती