डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ला आणि अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेविषयीचे दूर झालेले भ्रम

सोमवार, 15 जुलै 2024 (08:24 IST)
निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यामुळे अमेरिकेचं राजकारणच बदलून जाणार आहे.शनिवारी (13 जुलै) अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळेस झाडलेल्या गोळ्या डोनाल्ड ट्रम्प यांना फक्त चाटून गेल्या. मात्र त्या गोळीबारात प्रचार सभेला आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोनजण गंभीररित्या जखमी झाले.
 
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे 2024 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेला धक्का बसला आहे.
 
या हल्ल्यामुळे अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक सलोख्याला छेद गेला आहे. मागील अनेक दशकांपासून अमेरिकेच्या राजकारणातील सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल निर्माण झालेला भ्रम या घटनेमुळे नाट्यमयरित्या दूर सारला गेला आहे.
या हल्ल्यात ट्रम्प यांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र ते थोडक्यात बचावले.
 
ट्रम्प यांच्या डोक्याजवळून गोळी जात असताना त्याची लकेर हवेत उमटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सच्या डग मिल्स यांनी घेतलेल्या एका छायाचित्रात दिसतं आहे.
 
1981 मध्ये रोनाल्ड रेगन यांच्यावर जॉन हिंकले याने गोळी झाडली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर अशी प्रकारचा नाट्यमय हल्ला झालेला नाही. त्या घटनेला आता 43 वर्षं होतायत.
 
ट्रम्प यांच्यावरील हल्ला अमेरिकेच्या इतिहासातील काळ्या क्षणांची आठवण करून देतो. त्यावेळेस एक राष्ट्राध्यक्ष आणि एक राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार हल्लेखोरांच्या गोळ्यांनी मृत्यूमुखी पडले होते.
 
मेडगर ईवार्स, मार्टिन लुथर किंग ज्युनियर आणि माल्कम एक्स या सर्वांना देखील राजकीय हिंसाचारात आपला जीव गमवावा लागला होता.
 
आजच्या सारखंच, 1960 च्या दशकात देखील जेव्हा बंदूकीचा वापर करण्यास इच्छूक असलेली व्यक्ती इतिहासाला कलाटणी देऊ शकत होती, अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरण झालं होतं, व्यवस्था ढेपाळली होती.
शनिवारी घडलेल्या या धक्कादायक घटनांचा अमेरिकेवर आणि अमेरिकेतील राजकारणावर नेमके काय परिणाम होईल हे सध्या सांगता येणं अवघड आहे. या दरम्यान, अमेरिकेतील वातावरण शांत राहावं आणि राष्ट्राच्या एकतेला धक्का लागू नये यासाठी दोन्ही पक्षांनी आधीच आवाहन केलं आहे.
 
ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काही तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन डेलवेअरमध्ये प्रसार माध्यमांसमोर यासंदर्भातील प्रतिक्रिया देण्यासाठी हजर झाले होते.
 
"अमेरिकेत या प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. हे खूपच अस्वस्थ करणारं आहे. आपण असं हिंसाचारी असू शकत नाही. या प्रकारच्या हिंसाचाराला माफ करता येणार नाही," असं जो बायडन म्हणाले.
 
नंतर जो बायडन फोनवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलले.
 
वीकेंडच्या सुटीसाठी बायडन समुद्र किनाऱ्यावर गेले होते. मात्र त्यांनी आपली सुटी स्थगित केली आणि शनिवारी रात्री उशीरा ते व्हाईट हाऊसमध्ये परतले.
 
मात्र या हिंसाचारानंतर लगेचच दोन्ही पक्षांमध्ये उघडपणे टीका, हल्ले चढवणं सुरू झालं आहे. मागील काही दशकांमध्ये अमेरिकेच्या राजकारणाचं ते वैशिष्ट्य बनलं आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या काही राजकारण्यांनी ट्रम्पवरील हल्ल्याचा दोष डेमोक्रॅटिक पक्षाला दिला आहे.
 
ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेच्या लोकशाहीला धोका असल्याची वक्तव्ये आणि प्रचार बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून करण्यात येत होता. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आहे, असं रिपब्लिकन पक्षाचा आरोप आहे.
 
ओहायोचे सिनेटर जे. डी.वान्स यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, "माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हुकुमशाही वृत्तीचे आहेत आणि त्यांना सत्तेत येण्यापासून कोणत्याही परिस्थितीत रोखलं पाहिजे. यावर राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना जो बायडन यांचा प्रचार केंद्रित आहे. या प्रचाराची परिणती थेट माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नात झाली आहे."
 
जे डी वान्स यांना ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून निवडलं आहे.
 
ख्रिस लॅसिविटा हे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक आहेत.
 
ते म्हणाले की, "डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते, डेमोक्रॅटिक पक्षाला दान देणारे लोक आणि अगदी जो बायडन यांनाच मतदारांनी ट्रम्प यांच्याविरोधातील घृणास्पद वक्तव्यांसाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मतदानाच्या वेळेस मतदारांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे."
ख्रिस यांच्या या वक्तव्यावर डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक कदाचित आक्षेप घेतील. कॉंग्रेसच्या सदस्या असलेल्या गॅबी गिफर्ड्स यांच्यावर 2011 मध्ये अरिझोनामध्ये झालेल्या प्राणघातक गोळीबाराच्या काही महिने अगोदर उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या वक्तव्यांना दोषी ठरवण्यासाठी डाव्या विचारसरणीच्या अनेकांनी याच प्रकारची भाषा वापरली होती.
 
सोमवारपासून सुरू होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनावर पेनसिल्व्हेनियामध्ये झालेल्या हिंसाचाराचे गडद सावट असेल याबाबत शंका नाही. या अधिवेशनात सुरक्षा व्यवस्थेचे निकष कठोरपणे अंमलात आणले जातील. अधिवेशन स्थळाजवळ निदर्शनं आणि प्रती-निदर्शनं करण्यासाठी नव्यानं सूचना लागू केल्या जाऊ शकतात.
 
दरम्यान, गुरुवारी रात्री राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेले ट्रम्प जेव्हा व्यासपीठावर येतील तेव्हा त्यांच्याभोवतीचं वलय अधिक उजळ झालेलं असेल.
 
रक्तानं माखलेले आणि मूठ आवळून हवेत हात उंचावणारे ट्रम्प यांचे फोटो मिलवॉकीमध्ये प्रचाराचा केंद्रबिंदू आणि प्रतीक ठरतील यात शंका नाही. रिपब्लिकन पक्ष आधीच शक्ती आणि कणखर व्यक्तिमत्वं या मुद्द्यांना प्रचाराचा गाभा बनवण्याची योजना आखत होता. शनिवारच्या घटनेमुळं ट्रम्प यांचं कणखर व्यक्तिमत्व लोकांसमोर आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आता नवीन बळ मिळणार आहे.
हल्ला झाल्यानंतरच्या आपल्या वडिलांच्या (डोनाल्ड ट्रम्प) फोटोसह एरिक ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, "अमेरिकेला अशाच लढवय्याची गरज आहे."
 
ट्रम्प हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असल्यानं त्यांना देखील अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसचं सुरक्षा कवच पुरवण्यात आलेलं आहे. आता ट्रम्प यांच्या प्रचारसेभत हल्ला झाल्यामुळे सीक्रेट सर्व्हिसला देखील कठोर छाननी किंवा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. एक व्यक्ती शक्तीशाली रायफल घेऊन राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारावर गोळीबार करता येईल इतक्या जवळ येऊ शकली होती.
 
सभागृहाचे सभापती, माईक जॉन्सन यांनी आश्वासन दिलं आहे की त्यांचं कार्यालय या घटनेची संपूर्ण चौकशी करेल. अर्थात हा तपास पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.
 
मात्र सध्यातरी एक गोष्ट स्पष्ट आहे. ऐन निवडणुकीच्या वर्षात अमेरिकेतील राजकारणानं एक गंभीर वळण घेतलं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती