काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह एका गोणीत सापडला. सोमवारी 17 जानेवारी रोजी कदमटोली भागातील अलीपूर पुलाजवळ त्या भागातील स्थानिक लोकांना अभिनेत्रीचा मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
रायमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. हत्येनंतर रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह गोणीत बांधून रविवारी पुलाजवळ फेकून दिला होता. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ढाका पोलिसांना दिलेल्या अधिकृत निवेदनात अभिनेत्रीच्या हत्येमागील कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी, आता दिवंगत अभिनेत्रीच्या पतीने खुनाची कबुली दिली आहे. ढाक्याच्या वरिष्ठ न्यायदंडाधिकारी यांनी मंगळवारी शिमूचा पती शाखावतअलीम नोबेल आणि त्यांचा मित्र एसएमवाय अब्दुल्ला फरहाद यांना चौकशीसाठी कोठडी सुनावली.